Dr Siddharth Dhende | सामाजिक बांधिलकीतून उजळली दिवाळी – सावली संस्थेतर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते 250 बेघर आणि गरजूंना साड्या व फराळ वाटप
Diwali 2025 – (The Karbhari News Service) – दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. मात्र समाजातील काही घटक असे असतात ज्यांच्यापर्यंत या आनंदाचा प्रकाश पोहोचत नाही. अशा बेघर आणि बाहेरून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी २५० गरजू महिला आणि कुटुंबांना साडी तसेच दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते उपक्रम राबविला. सावली या सामाजिक संस्थेतर्फे आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्ते आम्रपाली मोहिते यांची ही संघटना हा उपक्रम गेली अनेक वर्ष राबवत आहे. (Pune News)
या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या बेघर, स्थलांतरित आणि दैनंदिन मजुरी करणाऱ्या महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. दिवाळीच्या काळात नव्या साडीचा आनंद आणि फराळाचा गोडवा या नागरिकांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने दिवाळीचे हास्य घेऊन आला.

कार्यक्रमाचे आयोजन गणेश लोंढे, ज्योती कांबळे, दीपमाला भोजने, संदिप चाबुक्स्वार आणि सौरभ कांबळे यांनी केले. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. दिवसभर सुरू असलेल्या या वाटप कार्यक्रमात स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग घेतला.
वाटपाचा कार्यक्रम अतिशय आनंदी वातावरणात पार पडला. लाभार्थी महिलांनी साड्या स्वीकारताना भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “प्रत्येक वर्षी दिवाळीच्या वेळी मुलांसाठी काही तरी करून सण साजरा करतो, पण स्वतःसाठी काही मिळत नाही. या वर्षी नवीन साडी आणि फराळ मिळाला, यामुळे खूप आनंद झाला, असे नागरिकांनी सांगितले.
समाजात अनेक वेळा आपण सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो, पण आपल्या सभोवतालचे काही लोक दिवाळीचा आनंद घेऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी काहीतरी करावे हीच भावना मनात होती. म्हणूनच या वर्षी सावली संस्थेकडून साड्या आणि फराळ वाटपाचा उपक्रम राबवला. यातून समाजात आनंद वाटण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

COMMENTS