Samajvadi Sammelan | समाजवाद्यांनो रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज व्हा – माताप्रसाद पांडे – समाजवादी एकजूटता संमेलनाचे उदघाटन
Mataprasad Pandey – (The Karbhari News Service) – सांप्रदायिकता आणि भांडवलशाही व्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी समाजवाद्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरचा लढा लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन उत्तरप्रदेशचे विरोधी पक्षनेता माताप्रसाद पांडे यांनी केले. (Pune News)
पुण्यातील सानेगुरुजी स्मारक येथे भारतीय समाजवादी आंदोलनाच्या 90 वर्षे पूर्तीनिमित्त आयोजित समाजवादी एकाजूटता संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तीन दिवसीय संमेलनासाठी देशभरातून शेकडो समाजवादी नेते, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी उदघाटन सत्राचे अध्यक्ष मध्यप्रदेशचे माजी मंत्री रमाशंकर सिंह, १०० वर्षीय ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार पंडित रामकिशन, सलीमभाई (कश्मीर), विजया चौहान, अन्वर राजन, प्रफुल्ल सामंत्रा (ओडिशा), मेधा पाटकर गजानन खातू, बी.आर. पाटील (कर्नाटक), माजी आमदार डॉ. प्रा. डॉ. आनंद कुमार आदी उपस्थित होते. या संमेलनाचे आयोजन राष्ट्रसेवा दल, एस एम जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, युसूफ मेहर अली सेंटर, समाजवादी समागम आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्यावतीने करण्यात आले होते.
माताप्रसाद पांडे म्हणाले, समाजवादी आंदोलनाने वेळोवेळच्या सरकारला कंट्रोल करण्याचे काम केले. आवाज उठवला. आंदोलने केली. आता ती चळवळ कुठे आहे ? समाजवादी चळवळीने आपल्या विचाराने गरीब, किसान, मागासांना वर आणण्याचे काम केले. आज आपण सांप्रदायिक, उन्मादवादी लोकांच्या जाळ्यात अडकलो आहे. त्यातून बाहेर पडणे, हाच या संमेलनाचा उद्देश आहे. भांडवलशाही व्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. समाजवादी विचार सर्वत्र पोहचवण्यासाठी पुढे या. ज्या संकल्पासाठी आपल्या लोकांनी कुर्बाणी दिली. तो संकल्प पुढे नेण्यासाठी पुढे या. समाजवादी विचारसरणी पुढे नेण्यासाठी एकत्र या ! असेही आवाहन पांडे यांनी केले.
प्रा. आनंद कुमार म्हणाले, समाजवादाने 19 व्या शतकापासून स्वातंत्र्य समता ही मूल्ये लोकांच्या मनात रुजवली. बेरोजगारी, गरीबी यापासून मुक्ती देणारी व्यवस्था म्हणजे समाजवाद. पण आज देशात अदाणी, अंबानी यांची ताकद वाढत असताना शेतकरी, शेतमजूर, कामागार यांची ताकद कमी होत आहे. अशा परीस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कामागार यांची ताकद वाढविण्यासाठी समाजवादाची आवश्यकता आहे.
या उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक ऍड. सविता शिंदे यांनी केले, तर डॉ. सुनीलम यांनी सूत्रसंचालन केले, संदेश दिवेकर यांनी आभार मानले. दत्ता पाकिरे, प्रशांत दांडेकर, प्रकाश डोबांळे, साधना शिंदे, फैयाज इनामदार, राहुल भोसले, भीमराव अडसूळ, विनायक लांबे आदींनी संमेलनाचे संयोजन केले.
—————–
चळवळीतील ज्येष्ठांचा सत्कार
समाजवादी चळवळीतील वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या कार्यकर्ते, नेते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रावसाहेब पवार, उमाकांत भावसार, राधा शिरसेकर, भीमराव पाटोळे, राजकुमार जैन, चंद्रा अय्यर आदी या सत्काराला उपस्थित होते. यावेळी समाजवादी आंदोलनाची 90 वर्षे या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. समाजवादी आंदोलनाचा प्रवास दर्शविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

COMMENTS