PMC Corporators | नगरसेवकांसाठी २९ मे रोजी एकदिवसीय पायाभूत प्रशिक्षण!| महापौर, माजी आयुक्तांसह तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

Homeadministrative

PMC Corporators | नगरसेवकांसाठी २९ मे रोजी एकदिवसीय पायाभूत प्रशिक्षण!| महापौर, माजी आयुक्तांसह तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

Ganesh Kumar Mule May 27, 2026 9:14 PM

PMC Sky Sign Department | जाहिरात फलकासाठी तात्पुरती मान्यता | १ एप्रिल पासून नवीन दर आकारले जाणार
Prajit Nair IAS | प्राजीत नायर यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पदाचा पदभार!
Prajit Nair IAS | मालमत्ता विवरणपत्र ३१ मे पर्यंत सादर करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश

PMC Corporators | नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी २९ मे रोजी एकदिवसीय पायाभूत प्रशिक्षण!| महापौर, माजी आयुक्तांसह तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

| महापालिका कामकाज, अधिनियम, अर्थसंकल्प ते विकास आराखडा यावर सत्रे

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या  नगरसेवकांसाठी शुक्रवार, २९ मे रोजी एकदिवसीय पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका कामकाज, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदी, सभा कामकाज नियमावली याबाबत सभासदांना माहिती व्हावी व नागरिकांचे प्रश्न सोडविताना अडचण येऊ नये, या उद्देशाने हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

हे प्रशिक्षण मनपा मुख्य इमारतीतील नवीन इमारतीमधील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला येथे सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:१५ या वेळेत होणार आहे. याबाबतचे पत्र अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर यांनी नगरसचिवांना पाठवले आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, समिती अध्यक्ष व सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामागील उद्देश

नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेचे कामकाज, कायदे, नियम व प्रशासनाशी समन्वय कसा साधावा याचे सखोल ज्ञान मिळावे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात संघर्ष न होता समन्वयाने काम व्हावे यासाठी माजी आयुक्त कुणाल कुमार मार्गदर्शन करणार आहेत. तर अर्थसंकल्प, निधी व्यवस्थापन, फाईल प्रक्रिया याबाबत सह आयुक्त अंबरीश गालिंदे माहिती देणार आहेत.

शहराच्या विकास आराखड्यासह MRTP व बांधकाम विभागाच्या कामकाजावर शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर तर प्रशासकीय गतिमानतेवर यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड मार्गदर्शन करतील. भविष्यातील पुण्याच्या विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका काय असावी यावर माजी महापौर अंकुश काकडे आपले विचार मांडणार आहेत.

महापालिकेत प्रथमच निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांना कामकाजाची माहिती नसते. त्यामुळे नागरिकांची कामे करताना अडचणी येतात. त्या टाळण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिका कामकाज, कायदे, अर्थसंकल्प व विकास आराखड्याची माहिती सभासदांना व्हावी, या उद्देशाने हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे.

सकाळी ९:३० पासून सत्रांना सुरुवात  

मनपा मुख्य इमारतीतील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला येथे सकाळी ९:३० वाजता प्रशिक्षणार्थींच्या नावनोंदणीने कार्यक्रमास सुरुवात होईल. नावनोंदणीची जबाबदारी प्रशासन अधिकारी श्रीमती संगीता कोकाटे यांच्याकडे आहे.

सकाळी ९:४५ वाजता महापौर मंजुषा नानापुरे यांच्या हस्ते प्रास्ताविक होईल. त्यानंतर सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या वेळेत नगर सचिव (सेवा निवृत्त) सुनील पारखी हे ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ आणि मुख्य सभा व स्थायी समिती कामकाज’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या सत्रात प्रश्नोत्तरांचाही समावेश आहे.

दुपारी १२:०० ते १२:४५ या वेळेत माजी महापालिका आयुक्त कुणाल कुमार (भा.प्र.से.) ‘लोकप्रतिनिधी आणि प्रशासन: संघर्ष नव्हे समन्वय’ या विषयावर नगरसेवकांशी संवाद साधतील.

दुपारच्या सत्रात अर्थसंकल्प ते विकास आराखडा  दुपारी १:०० ते २:०० या वेळेत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रात २:०० ते ३:०० या वेळेत सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा परिक्षक (सेवा निवृत्त) अंबरीश गालिंदे ‘अर्थसंकल्प, निधी व्यवस्थापन व फाईल प्रक्रिया’ याबाबत माहिती देतील.

३:०० ते ४:०० या वेळेत यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड ‘प्रशासकीय गतिमानता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ४:०० ते ५:०० या वेळेत शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर ‘MRTP व बांधकाम विभाग, शहर विकासाचे नियोजन’ यावर सादरीकरण करतील. यात Development Plan बाबत प्रश्नोत्तरेही होणार आहेत.

समारोप विरोधी पक्षनेत्यांच्या हस्ते

सायंकाळी ५:०० ते ६:०० या वेळेत माजी महापौर अंकुश काकडे ‘भविष्यातील पुणे: लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर विचार मांडतील. प्रशिक्षणाचा समारोप ६:०० ते ६:१५ या वेळेत विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या हस्ते होणार आहे.

महापालिकेचे कामकाज, नियम व प्रशासनाशी समन्वय कसा साधावा याचे सखोल ज्ञान मिळावे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी कळवले आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, समिती अध्यक्ष व सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: