पीएमपीच्या बसेस ग्रामीण भागात धावणार
: प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (PMP) बसेस जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीशेजारील ग्रामीण भागांमध्येदेखील सोडण्याच्या सूचना पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तरी प्रवाशांनी आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) संजय ससाणे यांनी केले आहे.
: खासगी बसेसना संप मागे घेईपर्यंत परवानगी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाने सर्व खाजगी प्रवासी बसेस, शाळेच्या बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास संप मागे घेईपर्यंत मान्यता दिली आहे.
या संदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे पुणे कार्यक्षेत्रातील प्रवाशांना खाजगी बस सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, वाहतूक पोलीस, पीएमपीएमएल व खाजगी बस वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून पुणे शहरातील एस.टी बस स्थानकांमधून खाजगी बसेसद्वारे आज (10 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजल्यापासून प्रवासी वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी एस.टी. प्रशासनाकडून सध्याच्या एस.टीच्या प्रचलीत भाडेदरांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारुन कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या आहेत.
COMMENTS