PMC Solid Waste Management | महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा आता स्वच्छतेचा पुणे पॅटर्न! | विविध उपाययोजना सुचवल्या
– परिमंडळ ५ अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी आता अन्य शहरांशी तुलना न करता पुढील एका वर्षात पुणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून उभे करायचे ठरवले आहे. आयुक्तांनी ‘स्वच्छतेचा पुणे पॅटर्न’ आखला आहे. तो देशापुढे आदर्श म्हणून प्रस्तुत करू, असा विश्वास देखील महापालिका आयुक्त यांनी व्यक्त केला आहे. (Pune Municipal Corpoation – PMC)
आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली परिमंडळ ५ अंतर्गत कार्यरत असलेल्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व मोकादम यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत घनकचरा व्यवस्थापन व शहराच्या स्वच्छतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे खातेप्रमुख संदीप कदम, परिमंडळ ५ चे उप आयुक्त सुनिल बल्लाळ, तसेच तीनही क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अभियंते उपस्थित होते. बैठकीदरम्यान मोकादम वर्गास काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत आयुक्तांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची माहिती घेतली. शहराच्या स्वच्छतेकरिता ऑन ग्राउंड कर्मचाऱ्यांना आवश्यक मदत / साधनसामग्री व त्यांच्या अभिनव कल्पना याबाबत जाणून घेतले. संबंधित अडचणींच्या तातडीच्या निवारणासाठी विभागीय स्तरावर आवश्यक समन्वय आणि संसाधन उपलब्धतेबाबत निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान मोकादमांनी प्रत्यक्ष कामकाज करताना येणाऱ्या वास्तव अडचणी स्पष्ट केल्या. त्यामध्ये प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
• काही नागरिकांकडून असहकार्य, कचरा नियमानुसार न देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे.
• कचरा वाहतूक वाहनांची संख्या अपुरी, पर्यायी गाड्या वेळेत न मिळणे.
• स्वच्छ संस्थेमार्फत अपेक्षित मनुष्यबळ उपलब्ध न होणे, ज्यामुळे सर्व घरांतील कचरा वेळेत संकलित करणे कठीण.
• वयस्कर स्वच्छता सेवकांकडून झाडणकाम व कचरा उचलण्याचे काम अपेक्षेप्रमाणे होत नसणे.
• काही वेळा दंडात्मक कारवाई न करण्यासाठी त्रयस्थांमार्फत दबाव येणे.
• अतिक्रमण आणि हातगाडी विक्रेत्यांकडून परिसरात अस्वच्छता वाढणे.
• झाडणकाम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसणे.
• स्वच्छ संस्थेतील अनेक सभासदांचे वय जास्त असल्याने कामाचा वेग कमी होणे.
• झोपडपट्टी भागात कचरा संकलन करताना अरुंद रस्ते, उंच-नीच भूभाग यात अडचणी निर्माण होणे.
• परिमंडळ क्र. ५ हा शहराच्या मध्यवर्ती असून बाजारपेठेचा भाग असल्याने सकाळी नऊ नंतर वाहनांची व नागरिकांची वर्दळ वाढून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची पार्किंग झाल्याने कचरा संकलन व झाडणकाम करणे अडचणीचे होते
• कचरा हस्तांतरण केंद्र व प्रक्रिया प्रकल्पांचे अंतर या परिसरापासून जास्त असल्याने वाहनांना कचरा खाली करून येण्यास जास्त वेळ लागणे
• विद्यार्थी व प्रवासी यांसारख्या floating population मुळे अस्वच्छतेचा भार वाढणे.
• पुणे मनपाच्या व दुय्यम कचरा वाहतूक वाहनांचे व चालकांचे नियंत्रण मोटार वाहन विभाग या मुख्य खात्याकडे असल्याने नियोजनात मर्यादा पडणे.
• रस्त्यावर दीर्घकाळ वाहने उभी राहिल्यानंतर त्यांच्या आसपास कचरा टाकला जाऊन chronic spots तयार होणे.
• रात्रपाळीमध्ये काही वेळा दमदाटी / असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागणे.
• दैनंदिन घरगुती कचऱ्या व्यतिरिक्त निर्माण होणारा इतर कचरा जसे की कापड, चिंध्या, फर्निचर, फोम, लेदर इ. कचऱ्यावर प्रक्रिया करणे साठी प्रकल्प नसल्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास निर्माण होणाऱ्या अडचणी

महापालिका आयुक्तांनी तातडीने हे दिले निर्देश
• कचरा वाहतूक वाहनांची संख्या आढावा घेऊन आवश्यकतेनुसार वाढविणे आणि पर्यायी वाहने तत्काळ उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था करणे.
• कचरा प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता व व्याप्ती वाढविण्याचे नियोजन गतीमान करणे
• सकाळी वेळेत वाहने उपलब्ध होणे व वाहने वेळेत खाली करणे करिता नियोजन करणे.
• क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर मानवबळ, साधनसामग्री व वाहतूक नियोजन अधिक समन्वयित पद्धतीने राबविण्याचे निर्देश.
• Chronic spots वर विशेष स्वच्छता मोहीम चालवून ते स्थायीपणे बंद करण्याचे उद्दिष्ट.
• रात्रपाळीतील सुरक्षा प्रणाली मजबूत करून कर्मचाऱ्यांवर होणारी दमदाटी प्रतिबंधित करणे.
• नजीक जागा उपलब्ध असल्यास कचरा हस्तांतरण केंद्र उभारणे
• वाहनांची वर्दळ सुरू होण्यापूर्वी कामकाज पूर्ण करणे करिता कामकाजाच्या वेळेत बदल करून सकाळी लवकर व रात्रपाळी मध्ये कामकाज पूर्ण करणे
• स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे करिता रेडिओ जाहिरात, बॅनर, फ्लेक्स, सिनेमागृहात जाहिरात देणे, नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून जनजागृती करणे.
• सर्व घंटागाड्यांवर PA (Public Address) यंत्रणा सुरू राहील व त्याद्वारे जनजागृतीची गाणे / जिंगल्स सुरू राहतील याची दक्षता घेणे.
• IEC वाहनाचा जास्तीत जास्त वापर करणे.
• स्कॉड वाहनांचा जास्तीत जास्त वापर करून दंडात्मक कार्यवाही वाढविणे
• सेवकांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी करणे, गणवेश (युनिफॉर्म) परिधान करणे व वेळेत कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहणे
• झोपडपट्टीमधील कचरा संकलन करणे व स्वच्छतेकरिता तज्ञ सल्लागारांसह आढावा घेऊन कार्यपद्धती निश्चित करणे.
——
“स्वच्छता कर्मचारी, मुकादम व अधिकारी यांनी समन्वयाने आणि नियोजनपूर्वक काम करणे अत्यावश्यक आहे. अन्य शहरांशी तुलना न करता पुढील एका वर्षात पुणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून उभे करायचे आहे. ‘स्वच्छतेचा पुणे पॅटर्न’ देशापुढे आदर्श म्हणून प्रस्तुत करू.”
— नवल किशोर राम, महापालिका आयुक्त

COMMENTS