PMC JE Exam Results | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा निकाल आचारसंहितेमुळे रखडला | मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले मार्गदर्शन

Homeadministrative

PMC JE Exam Results | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा निकाल आचारसंहितेमुळे रखडला | मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले मार्गदर्शन

Ganesh Kumar Mule May 27, 2026 7:50 PM

Lokmanya Tilak Award 2025 | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान!
CSR | Pune Municipal Corporation | CSR  माध्यमातून कोविड काळात  पुणे महापालिकेला दिलेली ७ कोटीची देणगी विना वापर पडून!
Maharera | ‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

PMC JE Exam Results | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा निकाल आचारसंहितेमुळे रखडला | मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले मार्गदर्शन

| १६९ पदांसाठी ४१ हजार अर्ज, मात्र परीक्षेला केवळ ५० टक्के उमेदवार उपस्थित

PMC Junior Engineer Recruitment – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आचारसंहिता लागू असल्याने रखडला आहे. निकाल जाहीर करण्याबाबत महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागवले आहे. शुक्रवारपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्तर येणे अपेक्षित असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.  (Prajit Nair IAS)

नायर म्हणाले की, निवडणूक आयोगाने एक नियमावली ठरवून दिली आहे. जर आचारसंहिता काळात काही गोष्टी जाहीर करायच्या असतील तर त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन घेता येते. त्यानुसार आम्ही मार्गदर्शन मागवले आहे. आजच म्हणजे बुधवारी आमचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले असून शुक्रवारपर्यंत त्यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित आहे.

तीन दिवसांत सात शहरांत परीक्षा

पुणे महापालिकेच्या वतीने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठीची परीक्षा २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी तीन दिवस घेण्यात आली. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर अशा सात शहरांतील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली.

४१ हजारांपैकी फक्त २० हजार उमेदवार हजर

महापालिकेने १६९ पदांसाठी १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अर्ज मागवले होते. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी नव्याने अर्ज केले होते. यापूर्वीच्या जाहिरातीवेळी २७ हजार ८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते व त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले होते. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या ४१ हजार २७२ इतकी झाली होती.
मात्र प्रत्यक्षात ४१ हजार २७२ उमेदवारांपैकी फक्त २० हजार ७३५ उमेदवारांनी परीक्षा दिली. उर्वरित २० हजार ५३७ उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले. म्हणजेच जवळपास ५० टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली नाही.

निकालाकडे उमेदवारांचे लक्ष

परीक्षा होऊन एक महिना उलटला तरी निकाल जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. आचारसंहिता काळात निकाल जाहीर केल्यास आक्षेप येऊ शकतो, या भीतीने मनपा प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्यानंतरच निकालाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कनिष्ठ अभियंता पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी निम्मे उमेदवार गैरहजर राहिल्याने स्पर्धा कमी होणार आहे. निकाल कधी लागणार याकडे आता सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: