Harshwardhan Sapkal | कामगार कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महात्मा गांधींच्या मार्गाने लढा उभारूया : हर्षवर्धन सपकाळ

HomeBreaking News

Harshwardhan Sapkal | कामगार कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महात्मा गांधींच्या मार्गाने लढा उभारूया : हर्षवर्धन सपकाळ

Ganesh Kumar Mule Aug 16, 2026 10:06 PM

Harshwardhan Sapkal | फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले; समता, बंधुता व सामाजिक न्यायाला बाजूला सारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न : हर्षवर्धन सपकाळ | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी फुले वाड्याला भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केले तसेच भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली
Harshwardhan Sapkal | महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का? राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा | हर्षवर्धन सपकाळ
Youth Congress Agitation | मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!

Harshwardhan Sapkal | कामगार कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महात्मा गांधींच्या मार्गाने लढा उभारूया : हर्षवर्धन सपकाळ

 

RMS – (The Karbhari News Service) –  “आमच्या लहानपणी वडीलधारी माणसं सांगायची—‘शिक्षण घे, कुठेतरी नोकरी मिळेल आणि तुझा प्रपंच सुरू होईल.’ मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिकण्याची कितीही जिद्द असली, गरज पडल्यास शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही. ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका आहे,” अशी परखड भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली. (Sunil Shinde RMS)

राष्ट्रीय मजदूर संघाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. रविवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता हा वर्धापन दिन सोहळा पार पडला.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, “आज देशातील बेरोजगारीची परिस्थिती गंभीर असताना कामगार कायद्यांमध्ये केले जाणारे बदल कामगारांच्या अडचणींमध्ये आणखी भर घालणारे आहेत. कामगारांना अधिक असुरक्षित आणि कंत्राटी व्यवस्थेवर अवलंबून करणाऱ्या या बदलांविरोधात कामगार संघटनांनी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे.”

विधानपरिषद आमदार आणि कामगार नेते भाई जगताप यांनी कामगारांना संघर्षासाठी आवाहन केले. ते म्हणाले, “महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या मनातील भीती दूर करून त्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले, त्याच पद्धतीने आज कामगारांनीही भीती झटकून संघटित होणे आवश्यक आहे. कामगार कायद्यांमध्ये होणारे प्रतिगामी बदल आणि वाढते कंत्राटीकरण याविरोधात सामूहिक ताकदीने लढावे लागेल. कंत्राटीकरणाची भीती मनातून काढून टाका.”

यावेळी भाई जगताप यांनी “पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से!” अशी घोषणा देत कामगारांमध्ये संघर्षाची ऊर्जा निर्माण केली.

राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांनी संघटनेच्या गेल्या २६ वर्षांच्या वाटचालीचा आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला. वेतन, सामाजिक सुरक्षा, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, कामगारांचे हक्क आणि सन्मानाचे जीवन यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाने सातत्याने लढा दिल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ उद्योगपती व समाजसेवक डॉ. डी. वाय. पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मेळाव्याच्या शेवटी कामगारांच्या हक्कांसाठी, संघटित संघर्षासाठी आणि कामगारांप्रती बांधिलकी जपण्यासाठी उपस्थितांनी सामूहिक शपथ घेतली. “हम होंगे कामयाब” तसेच “संघटनेची ढाल” या गीतांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले. आभार सेक्रेटरी एस. के. पळसे यांनी मानले, तर सूत्रसंचालन विशाल बागुल यांनी केले.

कामगारांचे हक्क, रोजगाराची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण यासाठी संघटित संघर्ष अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आला.

या मेळाव्यास एडवोकेट चंदू शेठ कदम गटनेते मनपा, पुणे शहर काँग्रेस पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम विभाग अध्यक्ष दीप्ती चौधरी, वैशाली भालेराव, विशाल मलके, वीज फेडरेशनचे प्रकाश गायकवाड यांनीही उपस्थित कामगारांना मोलाचे मार्गदर्शन केले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: