PMC Aundh Ward Office | Pune Metro | पुणे महापालिकेने पुणे मेट्रो ला ठोठावला १५ लाखांचा दंड!
PMC Aundh Ward Office – (The Karbhari News Service) – बालेवाडी हायस्ट्रीट समोरील मोकळ्या जागेमध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उत्खननाचा राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याच्या कारणावरून पुणे महापालिकेच्या औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पुणे मेट्रो ला १५ लाखांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम दोन दिवसात जमा नाही केली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील सहाय्यक आयुक्त गिरीष दापकेकर यांनी पुणे मेट्रोला दिला आहे. (Pune Metro News)
पुणे मेट्रो टाटा कास्टिंग यार्ड चे व्यवस्थापक यांना क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. त्यानुसार बालेवाडी येथे पाहणी केली असता बालेवाडी हायस्ट्रीट समोरील मोकळ्या भूखंडामध्ये हायवा डंपर च्याया तीन गाड्या मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी ५० ते ७० ट्रक राडारोडा टाकला असल्याचे आढळून आले. हा सर्व राडारोडा पुणे मेट्रो प्रकल्पातील असून अनधिकृतपणे राडारोडा टाकून उपद्रव निर्माण केलेबाबत प्रतिट्रक ट्रिप २५,०००/- (पंचवीस हजार) याप्रमाणे ६० वाहनांचे १५,००,०००/- (पंधरा लाख ) प्रशासकीय दंड पुणे मेट्रोला आकारण्यात आला आहे.
नोटीस मध्ये पुढे म्हटले आहे कि, बालेवाडी हायस्ट्रीट समोरील मोकळ्या भूखंडामध्ये टाकण्यात आलेला राडारोडाबाबत आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका कोषागारात पुढील दोन दिवसात रक्कम जमा करा. तसेच टाकलेला सर्व राडारोडा त्वरित उचलून घ्यावा. अन्यथा दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम जमा न केल्यास महाराष्ट्र पुणे मनपा अधिनियम १९४५ अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा नोटीस च्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त गिरीष दापकेकर यांनी दिला आहे.

COMMENTS