PMC Standing Committee | अत्यावश्यक सेवांच्या २०हून अधिक प्रस्तावांना मंजुरी
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांशी संबंधित विविध कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा, विद्युत यंत्रणा, घनकचरा, आरोग्य तसेच देखभाल-दुरुस्तीच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. आचारसंहितेच्या काळात अत्यावश्यक सेवा विस्कळित होऊ नयेत, यासाठी प्रशासनाशी चर्चा करून निकडीच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Shrinath Bhimale BJP)
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पाणीपुरवठा, जलवाहिन्या, पंपिंग यंत्रणा आणि आरोग्याशी संबंधित आवश्यक कामांना मंजुरी देण्यास अडचण नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार स्थायी समितीने विविध प्रस्तावांना मान्यता दिली, असे भिमाले म्हणाले.
स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयाच्या अखत्यारित गुजरवाडी फाटा, कात्रज-कोंढवा रस्ता, गुजर-निंबाळकरवाडी आणि नवीन धायरी भागातील जलवाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती, तसेच बालाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर परिसरातील पाणी वितरण व्यवस्था नियंत्रित करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, सणसनगर, नांदोशी तसेच नव्याने समाविष्ट नऱ्हे भागातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचाही यात समावेश आहे.
मुंढवा जॅकवेल व पंपहाउस येथील पंप क्रमांक ५ व ८ साठी स्पेअर पार्ट पुरविणे व दुरुस्ती, मोटार, ट्रान्सफॉर्मर, स्टार्टर आणि अन्य विद्युत यंत्रणेच्या देखभालीसाठी अनुक्रमे सुमारे ४९ लाख आणि ८८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जुने लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर, चिखली जलकेंद्रातील व्हीटी पंपांच्या दुरुस्तीची कामेही मंजूर झाली.
गणेशोत्सव व अन्य उत्सवांसाठी मोबाईल टॉयलेट पुरविणे व देखभाल करण्यासाठी सुमारे ६९.८५ लाख रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली. विविध कचरा प्रक्रिया प्रकल्पांतून निर्माण होणारा रिजेक्ट कचरा शास्त्रोक्त भूभरावापर्यंत वाहून नेण्यासाठी हायवा टिपर उपलब्ध करण्याच्या सुमारे ७९.९४ लाख रुपयांच्या कामालाही मंजुरी मिळाली. तसेच बालगंधर्व रंगमंदिराच्या सुधारणेसाठी सुमारे ६९.३४ लाख रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली.
याशिवाय प्रभाग क्रमांक ३ मधील विमाननगर, सोमनाथनगर, संजय पार्क, बर्माशेल आदी भागांतील देखभाल-दुरुस्तीची सुमारे ७६.५६ लाख रुपयांची कामे आणि प्रभाग क्रमांक ११ मधील पाणीपुरवठा विषयक दैनंदिन व्हॉल्व्ह संचालनाच्या सुमारे ८१.७७ लाख रुपयांच्या कामासही मंजुरी देण्यात आली.
या कामांना स्थायी समितीची मंजूरी
– स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयाअंतर्गत गुजरवाडी फाटा, कात्रज कोंढवा रस्ता या भागात व इतर परिसरात जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणे.
– मुंढवा जॅकवेल व पंप हाऊस येथील पंपाचे स्पेअर पार्ट पुरविणे व देखभाल दुरुस्ती करणे.
– जुने लष्कर जलकेंद्र येथे ठाकरसी झोनसाठी VT पंपसाठी स्पेअर पार्ट पुरविणे व पंप सेट दुरुस्त करणे.
– प्रभाग क्र.११ मध्ये पाणीपुरवठा विषयक दैनंदिन वॉल सोड बंद करणे.
– जनता वसाहत दांडेकर पूल ते राजाराम पूल पाणीपुरवठा विषयक दैनंदिन वॉल सोड बंद करणे.
– स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयाअंतर्गत नव्याने समाविष्ट गुजर निंबाळकर वाडी भागात जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणे.
– खडकवासला, नांदेड, किरकटवाडी सणसनगर, नांदोशी भागातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था नियंत्रित करणे.
– नवीन होळकर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र येथे VT पंपसाठी स्पेअर पार्ट पुरविणे व पंप सेट दुरुस्त करणे.
– देखभाल व दुरुस्तीची कामे करणे. प्रभाग क्र. ३ मध्ये विमाननगर, सोमनाथनगर, संजयपार्क, बर्माशेल व इतर ठिकाणी
– नव्याने समाविष्ट नहे भागातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था नियंत्रित करणे.
– स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयाअंतर्गत नव्याने समाविष्ट नवीन धायरी येथे पाणीपुरवठा विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे.
– स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयाअंतर्गत बालाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर परिसरात वितरण व्यवस्था नियंत्रित करणे.
– मुंढवा जॅकवेल व पंप हाऊस येथे मोटार, ट्रान्सफॉर्मर, स्टार्टर व इतर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती कामे करणे.
– गणपती उत्सव व इतर उत्सव मोबाईल टॉयलेट पुरविणेबाबत.

COMMENTS