PMC Third Party Inspection | पुणे महापालिकेच्या विकासकामांवर आयुक्तांचा ‘क्वालिटी कंट्रोल’! बिलापूर्वी Third Party तपासणी | निकृष्ट कामे केल्यास अधिकारीही जबाबदार

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विकासकामांच्या गुणवत्ता तपासणीबाबत जारी केले कार्यालयीन परिपत्रक

Homeadministrative

PMC Third Party Inspection | पुणे महापालिकेच्या विकासकामांवर आयुक्तांचा ‘क्वालिटी कंट्रोल’! बिलापूर्वी Third Party तपासणी | निकृष्ट कामे केल्यास अधिकारीही जबाबदार

Ganesh Kumar Mule Nov 26, 2026 7:58 PM

TDR Policy | भूसंपादनाची कार्यवाही कायमस्वरूपी वगळण्याचे अधिकार आता महापालिका अतिरिक्त आयुक्तांना! 
PMC Employees Union | ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची पुणे मनपा कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेकडे मागणी 
Bio- Metric Attendance System | महापालिकेत पुन्हा बायोमेट्रिक हजेरी!   | महापालिका आयुक्तांचे आदेश 

PMC Third Party Inspection | पुणे महापालिकेच्या विकासकामांवर आयुक्तांचा ‘क्वालिटी कंट्रोल’! बिलापूर्वी Third Party तपासणी | निकृष्ट कामे केल्यास अधिकारीही जबाबदार

 

Naval Kishore Ram IAS – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेमार्फत शहराच्या विविध भागांत करण्यात येणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि निर्धारित कालावधीत कामे पूर्ण होण्याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कडक निर्देश दिले आहेत. विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी कामांची गुणवत्ता तपासणी, अक्षांश-रेखांशासह छायाचित्रण, तृतीय पक्ष तपासणी तसेच अंतिम देयक अदा करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन परिपत्रकानुसार, शहरात विविध विभागांमार्फत करण्यात येणारी विकासकामे ही सार्वजनिक निधीतून केली जातात. त्यामुळे या कामांचा दर्जा, पारदर्शकता आणि वेळेत पूर्तता होणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून, अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संस्थांकडून कामांच्या गुणवत्तेबाबत तसेच कामे पूर्ण होण्यास होणाऱ्या विलंबाबाबत चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आयुक्तांनी हे निर्देश दिले आहेत.

तृतीय पक्ष संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणी
विकासकामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी शहर अभियंता कार्यालयामार्फत तृतीय पक्ष तपासणी (Third Party Inspection) बाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुणवत्तेचे अनुगमन सर्व खाते प्रमुखांनी तृतीय पक्ष संस्थेमार्फत करून घ्यावे आणि महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार कामांची गुणवत्ता पडताळणी करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

काम सुरू होण्यापूर्वी, सुरू असताना आणि पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रे
कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंता यांनी काम सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना तसेच काम पूर्ण झाल्यावर अक्षांश-रेखांश (Latitude-Longitude) असलेली छायाचित्रे घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कामाच्या प्रत्येक टप्प्याचे छायाचित्रण करून ते संबंधित प्रकरणात समाविष्ट करावे. तसेच कामाच्या गुणवत्तेची आणि मोजमापाची पडताळणी करून त्याबाबत योग्य नोंदी ठेवाव्यात. कामाच्या गुणवत्तेची आणि मोजमापाबाबतची जबाबदारी निश्चित करण्यावरही आयुक्तांनी भर दिला आहे.

पूर्ण झालेल्या कामांची रँडम पद्धतीने तपासणी
अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, उपआयुक्त आणि खातेप्रमुख यांनी कनिष्ठ अभियंत्यांनी पूर्ण केलेल्या कामांची रँडम पद्धतीने तपासणी करावी. कामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी आणि कामे योग्य प्रकारे पूर्ण झाली आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी ही तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.

अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य लेखापरीक्षकांकडूनही तपासणी
अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय किंवा परिमंडळ कार्यालयांतील तसेच मुख्य खात्यातील कामांची यादृच्छिक पद्धतीने (Random Selection) तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दक्षता विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या विकासकामांचीही तपासणी करून संबंधित अभियंत्यांनी आवश्यक माहिती आणि अहवाल सादर करावेत. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची नोंद घेऊन त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अंतिम बिल अदा करण्यापूर्वी गुणवत्ता तपासणी
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७ (३) (क) आणि अनुसूचीमधील संबंधित तरतुदींनुसार, अंतिम देयक अदा करण्यापूर्वी कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे विकासकामांचे अंतिम बिल अदा करण्यापूर्वी संबंधित कामाचा दर्जा, मोजमाप आणि आवश्यक गुणवत्ता निकष पूर्ण झाले आहेत की नाही, याची खात्री करणे आवश्यक राहणार आहे.

जिओ-टॅग छायाचित्रे आणि कागदपत्रांची जबाबदारी
कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंता यांनी कामांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी जिओ-टॅग छायाचित्रे (Geo-tagged Photographs) संबंधित कागदपत्रांसह समाविष्ट करावीत. यामध्ये कामाची अंदाजपत्रके, वित्तीय मान्यता, कामाचे आदेश, काम पूर्ण झाल्याची नोंद, बिले तसेच आवश्यक इतर कागदपत्रांचा समावेश असेल.

कामांच्या गुणवत्तेची खात्री करूनच देयक अदा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.

त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, कामांच्या गुणवत्तेत त्रुटी, कामांमध्ये अनियमितता किंवा निर्देशांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे प्रमुख, खातेप्रमुख, अधीक्षक अभियंता, उपआयुक्त तसेच वरिष्ठ स्तरावरील अभियंत्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.

कामांच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे परिपत्रक तात्काळ अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: