PMC Wagholi Power Supply | वाघोलीकरांच्या वीज समस्येवर नगरसेविकेची मागणी फेटाळली | “हा विषय आमच्या अखत्यारीतच नाही” — महापालिकेचे स्पष्टीकरण
PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – वाघोली परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या वीज पुरवठा समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका व स्थायी समिती सदस्या रत्नमाला संदिप सातव यांनी नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसवण्याची मागणी स्थायी समितीसमोर मांडली होती. मात्र या प्रस्तावावर महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला असून, हा विषय महापालिकेच्या विद्युत विभागाशी संबंधितच नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Pune PMC News)
नगरसेविका रत्नमाला सातव यांनी मुख्य अभियंता, विद्युत विभाग यांना पत्र पाठवून प्रभाग क्र. ४ ब, वाघोली येथे नवीन २०० केव्हीए/२२ केव्हीची रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बसवण्याची मागणी केली होती. वाघोली हा पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी एक असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. वाढती लोकसंख्या, नवीन गृहसंकुले, व्यावसायिक आस्थापना यामुळे विद्यमान वीज वितरण यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होत असून, त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार वीज खंडित होणे अशा समस्या उद्भवत असल्याचे सातव यांनी नमूद केले होते.
यासाठी त्यांनी दोन ठिकाणी नवीन रोहित्रे बसवण्याची विशिष्ट मागणी केली होती :
१. गणेश पार्क, आंजळकवाडी रोड, वाघोली — २०० केव्हीए/२२ केव्ही
२. बालाजी विहार, केसनंद रोड, वाघोली — २०० केव्हीए/२२ केव्ही
नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी या दोन्ही ठिकाणी नवीन रोहित्रे बसवण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. स्थायी समितीने या प्रस्तावावर विद्युत विभागाचा अभिप्राय मागवला होता.
प्रशासनाचे उत्तर : “हा विषय आमच्या अखत्यारीत नाही”
प्रशासनाने या मागणीबाबत स्पष्ट व नकारात्मक भूमिका मांडली आहे. पत्रानुसार, पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनांमधील विद्युत संच मांडणी व त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम मनपाच्या विद्युत विभागामार्फत करण्यात येते. मात्र नागरी वापर, निवासी संकुले तसेच व्यावसायिक आस्थापना यांना योग्य दाबाने तसेच अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) मर्यादित यांचीच आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे, सद्यस्थिती व तांत्रिक बाबी विचारात घेता, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये रोहित्र बसवणे ही बाब पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाशी संबंधितच नसल्याचे नमूद करत, ही बाब केवळ अवलोकनार्थ स्थायी समितीसमोर सादर करत असल्याचे प्रशासनाने पत्रात म्हटले आहे. म्हणजेच नागरी वीजपुरवठ्याचे रोहित्र बसवण्याचे काम मनपाच्या कार्यकक्षेबाहेरचे असून, यासाठी महावितरणकडेच पाठपुरावा करावा लागणार आहे, असा अप्रत्यक्ष निर्वाळा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
वाघोलीकरांची अडचण कायम
नागरीकरणाचा वेग लक्षात घेता वाघोली परिसरातील वीज पुरवठा समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, महापालिका आणि महावितरण यांच्यातील या अधिकारकक्षेच्या मुद्द्यामुळे प्रत्यक्ष उपाययोजना मात्र रखडण्याची शक्यता आहे. नगरसेविका सातव यांनी मांडलेल्या प्रस्तावाला प्रशासनाकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने, आता वाघोलीकरांना वीज समस्येच्या निराकरणासाठी महावितरणकडेच थेट पाठपुरावा करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थायी समितीच्या पुढील बैठकीत यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे वाघोलीकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS