Vishalgad News | Pune Congress | विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर येथे दंगल करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई झालीच पाहिजे | अरविंद शिंदे
Vishalgad News – (The Karbhari News Service) – राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या घरांची, दुकानांची व मालमत्तांचे प्रचंड नुकसान करण्यात आले. झुंडशाहीचा हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, या दंगेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळा, व कठोर कारवाई करावी अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘मुक आंदोलन’ करण्यात आले. (Arvind Shinde Pune Congress)
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्र ही साधू संतांची, थोर पुरुषांची, विचारवंत व समाजसुधारकांची भूमी आहे. शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यात हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत घातक व महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा आहे.
शिंदे पुढे म्हणाले, विशाळ गडावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत याबाबत कुणाच्याही मनात दुमत नाही. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड किल्यांचा वारसा जपला पाहिजे. अतिक्रमणाचे हे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे, न्यायालयातील सुनावणीवेळी सरकारी वकील उपस्थित नसतात, सरकार पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात असताना अचानक अशा काही हालचाली करून अतिक्रमणचा मुद्दा चव्हाट्यावर आणला गेला. विशाळ गडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली १४ तारखेला विशाळगडापासून काही किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावातील एका धर्माच्या लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, मारहाण करण्यात आली. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. विशाळगडावरील अतिक्रमण व गजापूर गावातील दंगल हे दोन्ही वेगळे विषय आहेत. सरकारने या संदर्भात सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली पाहिजे. राज्यात सामाजिक सलोखा व शांतता रहावी. राजकीय फायद्यासाठी कोणी धर्माच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही.’’ असेही शिंदे म्हणाले.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, आबा बागुल, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, नगरसेविका लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अजित दरेकर, रफिक शेख, संगिता तिवारी, सुनिल शिंदे, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, सौरभ अमराळे, समिर शेख, भरत सुराणा, द. स. पोळेकर, संगीता पवार, यशराज पारखी, राज अंबिके, सुजित यादव, राजू ठोंबरे, आसिफ शेख, अक्षय माने, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, रमेश सोनकांबळे, शिवा भोकरे, रवि ननावरे, संतोष आरडे, प्रदिप परदेशी, ॲड. रमेश पवळे, कृष्णा सोनकांबळे, जावेद निलगर, सद्दाम शेख, रजिया बल्लारी, उषा राजगुरू, छाया जाधव, वाहिद निलगर, शोभना पण्णीकर, सुनिता नेमुर, सुंदरा ओव्हाळ, अभिजीत गोरे, फिरोज शेख, महेश हराळे, सईदभाई सय्यद, रफिउद्दीन शेख, मशकुर शेख, शब्बीर शेख, क्लेमेंट लाजरस, रॉबर्ट डेव्हिड, सुनिल घाडगे, आशितोष शिंदे, लतेंद्र भिंगारे आदी उपस्थित होते.