Suhas Tingre NCP | पूरनियंत्रण कामांत दोन वर्षांचा विलंब | महापालिका प्रशासन ठेकेदाराच्या खिशात आहे का? – सुहास टिंगरे

HomeBreaking News

Suhas Tingre NCP | पूरनियंत्रण कामांत दोन वर्षांचा विलंब | महापालिका प्रशासन ठेकेदाराच्या खिशात आहे का? – सुहास टिंगरे

Ganesh Kumar Mule Jun 26, 2026 11:14 AM

PMC Payroll Online System |  ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणालीचा वापर करण्याबाबत काही विभागांची उदासीनता | प्रणाली वापरण्याचे अतिररिक्त आयुक्तांचे आदेश
PMPML | BRTS | पीएमपीने  बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली  | आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय 
Second installment | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 8-10 दिवसांत आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम रोखीने मिळणार

Suhas Tingre | पूरनियंत्रण कामांत दोन वर्षांचा विलंब | महापालिका प्रशासन ठेकेदाराच्या खिशात आहे का? – सुहास टिंगरे

| वडगाव शेरीतील २२ पैकी केवळ ४ कामे पूर्ण; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

 

PMC Standing Committee  – (The Karbhari News Service) –  वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या पूरनियंत्रणाच्या कामांमध्ये होत असलेल्या मोठ्या विलंबावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “पुणे महापालिका प्रशासन ठेकेदाराच्या खिशात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. (Vadgaonsheri  Constituency)

२०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. वडगाव शेरी मतदारसंघातही अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर तत्कालीन आमदार सुनील टिंगरे आणि तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून एनडीएमए अंतर्गत पुणे शहरातील सुमारे ६६ ठिकाणांसह वडगाव शेरी मतदारसंघातील २२ पूरनियंत्रण कामांसाठी जून २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली होती.

मात्र, २०२६ मध्ये महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत या कामांची माहिती मागविण्यात आली असता, २२ पैकी केवळ चार कामे पूर्ण झाल्याची, तर सुमारे दहा कामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, नगरसेवक सुहास टिंगरे यांनी प्रत्यक्ष स्थळांची पाहणी केली असता, सुरू असल्याचे सांगितलेल्या कामांपैकी एकही काम प्रत्यक्षात सुरू नसल्याचा आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागप्रमुख जगदीश खानोरे यांनी काही अभियंते तसेच प्रायमो या सल्लागार संस्थेच्या अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

सुहास टिंगरे यांनी सांगितले की, स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत या कामांचा आढावा मागवूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. अखेर २५ जून रोजी झालेल्या बैठकीत प्रकल्पप्रमुख गोजारे यांनी सादर केलेल्या लेखी अहवालातून एम. बी. पाटील या कंत्राटदाराला देण्यात आलेल्या बहुतांश कामांना अद्याप प्रत्यक्ष सुरुवातच झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. वर्क ऑर्डर होऊन जवळपास दोन वर्षे उलटूनही अनेक ठिकाणी कामाचा साधा प्रारंभही झालेला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या विलंबामुळे धानोरीतील लक्ष्मीनगर, कळस, पोरवाल रोड, खेसे पार्क, लोहगाव-वाघोली रोड, कर्मभूमी परिसर, वडगाव शेरी, चंदननगर आणि येरवडा या भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रत्येक पावसाळ्यात पूरस्थितीमुळे जीवित व वित्तहानीचा धोका कायम असल्याचे टिंगरे यांनी बैठकीत नमूद केले.

दोन वर्षांपूर्वी कामाचे आदेश देऊनही संबंधित कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करत, संबंधित कंत्राटदाराचे एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीशी कौटुंबिक संबंध असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोपही सुहास टिंगरे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली.

दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान महापौर मंजुषा नागपुरे यांनी धावती भेट देऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी एनडीएमए अंतर्गत सुरू असलेल्या कामांची वैयक्तिक दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी नगरसेवक सुहास टिंगरे यांनी वडगाव शेरी मतदारसंघातील पूरनियंत्रणाची सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: