Pune PMC News | नव्याने समाविष्ट गावांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित एलईडी पोल नको : प्रशासनाचा नकारात्मक अभिप्राय
वीजवर आधारित एलईडी दिवे बसवणार
बॅटरी देखभाल, चोरी आणि खर्चाच्या अडचणींमुळे प्रशासनाचा स्थायी समितीला अभिप्राय
PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये स्वतंत्र सौर ऊर्जेवर आधारित एलईडी पोल प्रणाली राबवणे सध्या तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य नाही, असा अभिप्राय महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे. त्याऐवजी महावितरणच्या वीज जोडणीद्वारे एलईडी पथदिवे बसवण्यात येणार आहेत. (PMC Merged Villages)
स्थायी समितीच्या ठरावानंतर प्रशासनाचा अभिप्राय
स्थायी समिती ठराव नुसार नव्याने समाविष्ट गावांतील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि वस्त्यांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित एलईडी पोल बसवण्याचा प्रस्ताव होता. त्यावर प्रशासनाने सविस्तर अभिप्राय दिला आहे.
स्वतंत्र सौर पोल का नकोत, प्रशासनाने दिली कारणे
प्रशासनाने अभिप्रायात म्हटले आहे की, यापूर्वी काही उद्यानांमध्ये सौर स्ट्रीट लाईट बसवण्यात आले होते. मात्र कालांतराने बॅटरीचे आयुष्य संपल्याने अनेक ठिकाणी ते बंद पडले.
स्वतंत्र सौर पोल प्रणाली न राबवण्यामागे मुख्य कारणे पुढीलप्रमाणे:
1. प्रत्येक पोलसाठी स्वतंत्र सौर पॅनल, बॅटरी आणि नियंत्रण प्रणाली लागते. त्यामुळे देखभाल खर्च वाढतो.
2. दाट शहरी भागात इमारती आणि झाडांमुळे सौर पॅनलवर सावली पडते. त्यामुळे अपेक्षित वीज निर्मिती होत नाही.
3. बॅटरीची नियमित देखभाल, वेळोवेळी बदलणे, चोरी आणि तोडफोडीचा धोका असतो.
4. पुणे मनपाच्या बहुतांश भागात महावितरणची वीज उपलब्ध आहे. त्यामुळे वीजवर आधारित एलईडी पथदिवे अधिक कार्यक्षम आणि देखभालीसाठी सोपे आहेत.
नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक प्रकाश व्यवस्था नव्हती किंवा अपुरी होती, तेथे टप्प्याटप्प्याने वीजवर चालणारे एलईडी पथदिवे बसवण्यात येत आहेत.
सन 2023-24 मध्ये 1748, सन 2024-25 मध्ये 1666 आणि सन 2025-26 मध्ये 2363 स्ट्रीट लाईट पोलचे काम पूर्ण झाले आहे. सन 2026-27 मध्ये आणखी 1275 दिवे बसवण्याचे नियोजन आहे.
सौर ऊर्जेचा वापर छतावरील प्रकल्पांमधून
प्रशासनाने सौर ऊर्जेचा वापर बंद केला नसून तो छतावरील प्रकल्पांद्वारे केला जात आहे. RESCO मॉडेल अंतर्गत 2018 ते 2020 या काळात 9 प्रकल्प 835 kWp क्षमतेचे राबवले. त्यातून 30,32,136 युनिट वीज निर्मिती झाली.
CAPEX मॉडेल अंतर्गत 2018 ते 2023 मध्ये 24 प्रकल्प 707 kWp चे राबवले. त्यातून 43,34, 809 युनिट वीज निर्मिती झाली. ही वीज मनपाच्या इमारतींमध्ये वापरली जात आहे.
याशिवाय माझी वसुंधरा अभियानांतर्गत 690 kWp आणि जल ही अमृत योजनेअंतर्गत विठ्ठलवाडी, एरंडवणे, तानाजीवाडी, बोपोडी, खराडी, मुंढवा, बाणेर आणि नायडू येथील 8 मलप्रवाह शुद्धीकरण केंद्रांवर 720 kWp क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
2026-27 मध्ये मनपाच्या विविध इमारतींवर 3.5 MWp क्षमतेचे रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वरील सर्व बाबी लक्षात घेता नव्याने समाविष्ट गावांमध्ये स्वतंत्र सौर ऊर्जेवर आधारित एलईडी पोल प्रणाली कार्यान्वित करणे सध्या योग्य नाही.

COMMENTS