Pune Breaking News | ऐतिहासिक कात्रज–शनिवारवाडा भूमिगत पाणीपुरवठा योजनेच्या जीर्णोद्धाराला पुणे महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी

Homeadministrative

Pune Breaking News | ऐतिहासिक कात्रज–शनिवारवाडा भूमिगत पाणीपुरवठा योजनेच्या जीर्णोद्धाराला पुणे महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी

Ganesh Kumar Mule Jun 30, 2026 8:58 PM

Swachh Survekshan Award | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार क्रमवारीत पुण्याला देशात पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
Video | Mock Drill | PMC Pune | पुणे महापालिकेत धमाका होतो तेंव्हा ..! 
Firecracker stalls | PMC Pune | अनधिकृत फटाका विक्री स्टॉल उभारणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होणार | पुढील वर्षी परवानगीही मिळणार नाही | माधव जगताप यांचे आदेश

Pune Breaking News | ऐतिहासिक कात्रज–शनिवारवाडा भूमिगत पाणीपुरवठा योजनेच्या जीर्णोद्धाराला पुणे महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service)  – पुणे शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, कात्रज ते शनिवारवाडा पेशवेकालीन भूमिगत पाणीपुरवठा योजनेच्या संपूर्ण जीर्णोद्धार व संवर्धनाच्या प्रस्तावाला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
हा ठराव नगरसेवक  सुहास विजय टिंगरे (Suhas Tingre NCP) यांनी मांडला होता. मागील महिन्यात स्थायी समितीत या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता मुख्य सभेनेही या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पेशवेकालीन काळात कात्रज तलावातून नैसर्गिक उताराचा वापर करून दगडी व मातीच्या भूमिगत पाईपद्वारे शनिवारवाडा परिसरासह शहराच्या विविध भागांना पाणीपुरवठा केला जात होता. सुमारे २० किलोमीटर लांबीची ही जलवाहिनी त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याचे आणि जलव्यवस्थापनाचे प्रतीक मानली जाते.
मात्र कालांतराने या ऐतिहासिक जलव्यवस्थेचे अनेक भाग दुर्लक्षित झाले असून काही ठिकाणी ते नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे या अमूल्य वारशाचे संरक्षण, अभ्यास, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या ठरावानुसार कात्रज ते शनिवारवाडा या संपूर्ण जलवाहिनीचे पुरातत्त्वीय व तांत्रिक सर्वेक्षण करून उपलब्ध भूमिगत पाईपलाईन, हौद आणि जलसाठ्यांचे जतन व पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच या ऐतिहासिक जलव्यवस्थेला ” वारसा संवर्धन प्रकल्प” म्हणून विकसित करून नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी माहितीफलक, अभ्यासदौरे व वारसा पर्यटन उपक्रम राबविण्याचा मानस आहे. आवश्यक त्या ठिकाणी राज्य पुरातत्त्व विभाग व इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन घेऊन या प्रकल्पासाठी विशेष निधीचीही तरतूद करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना  सुहास विजय टिंगरे म्हणाले, “पुण्याचा ऐतिहासिक वारसा जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे . कात्रज–शनिवारवाडा जलवाहिनी ही आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचे आणि अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक आहे. मुख्य सभेची मंजुरी मिळाल्याने या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यातील पिढ्यांसाठी हा अमूल्य ठेवा जतन करण्यास मोठी मदत होईल.”

हा निर्णय पुण्याच्या ऐतिहासिक ओळखीच्या जतनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि नागरिकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: