PMC Labour Welfare Department |पुणे महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सुनील रासने यांचा सत्कार!
Nitin Kejale PMC – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीमार्फत कामगारांसाठी प्रतिवर्षी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयात कामगार दिंडीचे आयोजन करण्यात येते. सदर कामगार दिंडीव्दारे शहर स्वच्छता, आरोग्य, ओला सुका कचरा वर्गीकरण, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण, वीज, पाणी बचत, वेळेवर कर भरणा, इत्यादी बाबींसंदर्भात प्रबोधन केले जाते. सदर उपक्रमात मनपा कामगार कलापथकाचे पथनाट्याचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. कामगार दिंडीतील सहभागी सेवक, कलापथकातील कलाकार यांचे सक्रीय सहकार्य दिंडीस असते. (Sunil Rasane Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Trust)
पुणे महानगरपालिकेची कामगार दिंडी आळंदी ते पुणे पायी मार्गक्रमण होत असतांना त्यामध्ये समाज व नागरी सुविधांबाबत प्रबोधन करीत असते. कामगार दिंडीमध्ये दरवर्षी ५०० ते ८०० कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. सदर कर्मचारी हे या दिंडीमध्ये भक्तिभावाने सहभागी होतात. सदर दिंडीमध्ये कर्मचारी पारंपारिक पोशाखामध्ये टाळ, मृदुंग, भजन, कीर्तन करीत आळंदी ते पुणे पायी मार्गक्रमण करतात. दिंडीकरिता क्रीडांगणाची व्यवस्था गेणबा सोपानराव मोझे अध्यापक विद्यालय, आळंदी रोड, पुणे यांचेतर्फे केली जाते.
सदर मार्गामध्ये राम सहकारी सोसायटी येथे दिंडीची विश्रांती, भजन, कीर्तन व भोजन केले जाते. याठिकाणी मांडवाची व्यवस्था ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे केली जाते. तसेच त्यांचेकडून या उपक्रमास आर्थिक मदत ही केली जाते. याठिकाणी भोजन व्यवस्था काही सेवानिवृत्त सेवकांतर्फे केली जाते. तसेच दिंडीमध्ये सकाळची अल्पोपहार व्यवस्था श्री.मधुकर नरसिंगे, श्री. पठारे व त्यांचे सहकारी यांचेतर्फे केली जाते व संध्याकाळची अल्पोपहार व्यवस्था ही सुरक्षा विभाग व पुणे म्युनिसिपल को-ऑप. अर्बन बँक लि. यांचेतर्फे केली जाते.
वरीलपैकी भोजन व्यवस्था व अल्पोपहार व्यवस्था करणारे संबंधित पदाधिकारी, विद्यमान सेवक व सेवानिवृत्त सेवक यांचा सत्कार २०/०६/२०२५ रोजी आयोजित कामगार दिंडीमध्ये करण्यात आला होता. तथापि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांचे बहुमूल्य आर्थिक मदत व मंडप व्यवस्थेबाबत त्यांचाही सत्कार व आभार प्रदर्शन करावयाचा मनोदय मुख्य कामगार अधिकारी यांनी अध्यक्ष सुनीलभाऊ रासने यांच्याकडे व्यक्त केला होता. अध्यक्ष सुनीलभाऊ रासने यांनी त्यास सहमती दर्शवून ते स्वतः महापालिकेत येतील असे सांगितले होते. त्यानुसार आज रोजी सुनीलभाऊ रासने, अध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे स्वतः महापालिकेत उपस्थित होते. त्यांचा मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
या प्रसंगी सदर ट्रस्टचे सभासद विलास रासकर उपस्थित होते. या प्रसंगी सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय, शैक्षणिक योजनांची माहिती दिली. तसेच त्यांनी त्यांच्या वैद्यकीय सुविधेमुळे व शैक्षणिक सहाय्य उपक्रमामुळे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर असल्याचे उदाहरणे दिली. तसेच अनेक अतिजोखामिचे रुग्ण, किडनी प्रत्यारोपण, लहान मुले ज्यांच्या हृदयामध्ये छिद्र आहे असे रुग्ण बरे होवून त्यांचे जीवनमान वाढले असल्याची उदाहरणे दिली. तसेच त्यांनी असेही नमूद केले की मनपा कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या मुलांना वैद्यकीय मदत अथवा शैक्षणिक आर्थिक सहाय्य आवश्यक भासल्यास त्यांनी ही या ट्रस्टकडे संपर्क साधावा. त्यांनाही आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.
सदर सत्कार समारंभास भोजन व्यवस्था मंडळाचे सदस्य श्री.अशोक ढगे व श्री.श्रीधर चव्हाण तसेच कामगार दिंडी अल्पोपहार व्यवस्थांचे सदस्य श्री.दत्ताराम महाडिक व श्री. प्रमोद मायने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार कल्याण विभागातील मनिषा कायटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सेवानिवृत्त सेवक व भोजन समितीचे सदस्य श्रीधर चव्हाण यांनी केले.
COMMENTS