Padma Award 2025 | मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार, डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार
| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
Republic Day 2025 – (The Karbhari News Service ) – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या पद्मपुरस्कार विजेत्यांचं तसंच महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कारांचे मानकरी ठरलेले निसर्गलेखक, निसर्गअभ्यासक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, वने आणि वन्यजीव संवर्धक चैत्राम देवचंद पवार, विदर्भातील वैद्यकीय सेवेचे भीष्मपितामह होमिओपॅथीचे डॉ. विलास डांगरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. (Ajit Pawar)
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, वनं, पर्यावरण आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळलेल्या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यातल्या प्रत्येक निसर्गप्रेमीचा गौरव आहे. जंगल वाचणारा माणूस ही ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनी इतरांनाही जंगल वाचायला शिकवलं. त्याबाबतची गोडी निर्माण केली. त्यातून वनांच्या संरक्षणाबाबतची जागृती वाढली, हे त्यांचं मोठं यश आहे, असं मी मानतो.
चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदंच आहे. छोट्यामोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करणे. जंगल, पशु, पक्षी यांच्या संरक्षण, संवर्धनाची सक्रीय चळवळ उभारण्याच्या त्यांच्या कार्याचा, पद्मश्री पुरस्काराने झालेला गौरव निसर्गाबद्दल आवड असलेल्या युवापिढीला प्रेरणा देणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे.
होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा, अर्ध्या शतकाहून अधिक काळ विदर्भातील गरीबांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या समर्पित वृत्तीचा गौरव आहे. विदर्भातील वैद्यकीय सेवेतील भीष्मपितामह असा गौरव असलेल्या डॉ. विलास डांगरे यांनी ध्येयनिष्ठेने, समर्पित वृत्तीने पन्नास वर्षांहून अधिक गरीब रुग्णांची सेवा केली. याकाळात डॉक्टरांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा समर्पित सेवाकार्याचा गौरव आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
COMMENTS