Hinjewadi IT Park Rain ओढे- नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती | संबंधितांवर पीएमआरडीए, एमआयडीसीसह इतर यंत्रणांकडून होणार कारवाई
PMRDA – (The Karbhari News Service) – हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात नियमांचा भंग करून ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळेच पूर परिस्थिती निर्माण होत आहे. पीएमआरडीएसह एमआयडीसी हद्दीतील १३ ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदल तसेच रोखणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे (Dr Yogesh Mhase IAS) यांनी नुकतीच लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेत संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. (Hinjewadi News)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह एमआयडीसी हद्दीतील ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह काही कंपन्या, बिल्डर आणि नागरिकांनी परस्पर रोखला तसेच स्थलांतरित केला आहे. काही ठिकाणी मनमर्जीप्रमाणे बांधकामे करण्यात आल्याचे पुढे येत असून संबंधित बांधकामे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासह प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने बांधकामे करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया आगामी काही दिवसात करण्यात येणार आहे.
हिंजवडीसह परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा रस्ते दुरुस्तीसह नागरी सोयी सुविधांच्या अनुषंगाने बहुतांश कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे. हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसह मेट्रो मार्गिकेलगतचा राडारोडा हटवणे, गटार व नालेसफाई, खड्डे बुजवणे, अनधिकृत स्टॉल हटवणे यासह इतर आवश्यक ती कामे पूर्ण झाल्याने नागरी समस्या निश्चितच सुटणार आहे. यासह पीएमआरडीए आणि एमआयडीसी हद्दीतील नैसर्गिक ओढे – नाल्यांतील पाण्याचा प्रवाह परस्पर रोखला तसेच स्थलांतरित करण्यात आला, अशी १३ ठिकाणे शोधण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुला करावा, अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
या भागात रोखण्यात आला ओढ्या नाल्यांचा प्रवाह
१) ग्लोबल सेझ टेक पार्कजवळ, भोईरवाडी
२) टाटा कन्सल्टन्सीजवळ, भोईरवाडी
३) मेट्रो पोलिस मेट्रो स्टेशनजवळ, मान
४) माण देवी मंदिर -१ मान
५) माण देवी मंदिर, ग्रामपंचायत
६) स्मशान भूमी, मान
७) टेक महिंद्रा आयटी पार्कजवळ, मान
८) क्वाड्रॉन मेट्रो स्टेशन वन विभागाच्या जागेलगत, मान
९) गट नं. २८६ जवळ, मान
१०) गट नं. २८६ जवळ, मान
११) गट नं. २८१ जवळ, मान
१२) गट नं. २७९ जवळ, मान
१३) गट नं. २७१, २७२, २७३ जवळ, मान
COMMENTS