Shivsena Pune | हडपसरमध्ये ड्रेनेज व्यवस्थेचा गंभीर बिघाड, शिवसेनेचा प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम!
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारीनंतर आज शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने घटनास्थळी पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात ड्रेनेज व्यवस्थेतील अत्यंत गंभीर त्रुटी समोर आल्या असून, प्रदूषित सांडपाणी व पिण्याच्या नळाच्या पाण्याचे मिश्रण होण्याचे अनेक ठिकाणी वास्तव उघडकीस आले आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराज उद्यान,सातव नगर, गणेश कॉलनी रहमानी कॉलेज,तरवडे वस्ती,आंबेकर मळा, मार्गोसा सोसायटी या भागांमध्ये पाहणी करण्यात आली. (Hadapsar Constituency)
या संदर्भात पुणे महानगरपालिका प्रशासनाला यापूर्वीही वेळोवेळी लेखी स्वरूपात लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आजवर फारशा ठोस कृतीचा अभाव जाणवत असून, नागरिक आरोग्याच्या मोठ्या संकटात सापडले आहेत. साचलेले सांडपाणी, बंद नाले, उघड्या गटारी आणि त्यातून पसरणारा दुर्गंधीयुक्त व विषारी प्रवाह यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यावेळी प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हडपसर मतदारसंघातील संपूर्ण ड्रेनेज यंत्रणा कोलमडली असून, पिण्याच्या पाण्यात सांडपाण्याचा प्रवेश होतोय, ही बाब अत्यंत गंभीर आणि जीवघेणी आहे. प्रशासनाने येत्या आठ दिवसांत संपूर्ण ड्रेनेज यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करून ती कार्यान्वित करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारला जाईल.”
शिवसेनेने महापालिका प्रशासनास एक प्रकारचा अंतिम इशारा दिला असून, या आठवड्यात कोणतीही ठोस कृती झाली नाही तर जनतेच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करण्याची शिवसेनेची परंपरा पुन्हा सिद्ध होईल, असेही भानगिरे यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक २६ मधील अनेक ठिकाणी पिण्याच्या नळांतून सांडपाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून काही ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था उघडी आणि साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त झाले आहेत,महापालिका प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसून येत्या ८ दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल
शिवसेनेच्या या निरीक्षण दौऱ्यात पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
हडपसरकरांचे आरोग्य आणि सन्मान अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS