Dr Siddharth Dhende | परभणीतील शहीद भीम सैनिकाच्या मृत्यू प्रकरणी प्रभाग दोन मध्ये उत्स्फूर्त बंद | नागरिकांकडून नागपूर चाळ, समता नगर येथे स्वयंस्फूर्तीने पुकारला बंद
– कारवाई न करता संविधानाचा अपमान प्रकरणी राज्य सरकारचीच माथेफिरू भूमिका : डॉ. सिद्धार्थ धेंडे
Parbhani Violence – (The Karbhari News Service) – परभणी येथे संविधानाचा अपमान करणाऱ्याला माथेफिरू संबोधन वापरून त्याचा कायद्याच्या कचाट्यातून बचाव करण्याची कृती राज्य सरकार करत आहे. माथेफिरू असेल तर त्याला संविधान हेच का दिसले असा प्रश्न उपस्थित करत पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. परभणीतील त्या आरोपीसह पोलीस कोठडीत भीम सैनिकाचा मृत्यू झाल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील भीमसैनिक, नागरिकांच्या वतीने (मंगळवार, दि. १७) स्वयं-स्फुर्तीने बंद पुकारण्यात आला होता. परभणी येथे संविधानाचा अपमान करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी. तसेच पोलिस कोठडीत शहीद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या भीम सैनिकाला मारहाण करण्याचा आदेश देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. यावेळी नागपुर चाळ व समतानगर मधुन निषेध रॅली आयोजित करण्यात आली. लुंबिनी चौक येथे श्रद्धांजली सभाने रॅलीची सांगता झाली. यावेळी डॉ. धेंडे बोलत होते.
या वेळी विजय कांबळे, गजानन जागडे, धवल कांबळे, घनशाम पंचमुख, महेश पाटील, मंदार खरात, विक्की साळवे, अनिल कांबळे, सुधीर जगताप, शेखर शेंडे, अशोक अवचरे, यशवंत शिर्के, डाॅनिअल मगर, जमिर शेख, प्रशांत वावरे, सुनिल भालेराव, गणेश पारखे, अमजद मगदुम , रियाझ शेख, मालती धिवार, निकाळजे ताई, कमल कांबळे, मिना पाटील , सुरैया खेख, विपुल सुर्वे आदीसह प्रभागातील भीमसैनिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. धेंडे म्हणाले की, प्रत्येक वेळी संविधानाचा अपमान करणारे वाढत आहेत. त्यांचा योग्य वेळी बंदोबस्त करणे आवश्यक असते. मात्र त्यांचा बचाव करण्याचे चुकीचे काम महायुतीचे सरकार करत आहे. परभणीत संविधानाचा अपमान केला जातो. एका भीमसैनिकांचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो. त्याचा साधा निषेध संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला नाही. त्यांच्या या कृत्याचा देखील मी निषेध करतो. तसेच शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करण्याचा ज्या पोलीस अधिकाऱ्यांने आदेश दिला होता. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच संविधानाचा अपमान करणाऱ्या वर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी, डॉ. धेंडे यांनी केली.
———————
COMMENTS