Pune PMC News | पुणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी ट्रिपल धमाका! | गौरी, अनंत चतुर्दशी, धनत्रयोदशीला सलग सुट्टीचा योग
PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून, सन २०२६ या वर्षासाठी महापालिकेच्या सर्व कार्यालयांना तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतचे कार्यालयीन परिपत्रक अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजीत नायर (Prajit Nair IAS) यांच्या स्वाक्षरीने नुकतेच जारी करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)
विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन २०२६ करिता तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या आदेशाच्या आधारे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) कार्यालयाच्या २ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ घेत, पुणे महानगरपालिकेनेही याच सुट्ट्या आपल्या सर्व कार्यालयांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या असतील तीन जादा सुट्ट्या :
१८ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार) – ज्येष्ठागौरी पूजन
२५ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार) – अनंत चतुर्दशी
०६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) – धनत्रयोदशी
विशेष म्हणजे या तिन्ही सुट्ट्या शुक्रवारी येत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवारसह सलग तीन दिवसांची सुट्टी उपभोगता येण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात या सुट्ट्या असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या सुट्ट्या पुणे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना लागू असतील, मात्र अत्यावश्यक सेवा (इसेन्शियल सर्व्हिसेस) यातून वगळण्यात आल्या आहेत, म्हणजेच अशा विभागांचे कामकाज या दिवशीही नेहमीप्रमाणे सुरू राहील. हे परिपत्रक सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, उपायुक्त (परिमंडळ १ ते ५) आणि सहाय्यक आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.
—

COMMENTS