Pune Dengue Cases 2026  | पुण्यात डेंग्यूचा उद्रेक! १० महिन्यांत २,४१३ रुग्ण; महापालिकेची धडक मोहीम, ६.३० लाखांचा दंड वसूल

पुण्यात डेंग्यूचे २,४१३ रुग्ण; डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून तपासणी आणि दंडात्मक कारवाई.

Homeadministrative

Pune Dengue Cases 2026  | पुण्यात डेंग्यूचा उद्रेक! १० महिन्यांत २,४१३ रुग्ण; महापालिकेची धडक मोहीम, ६.३० लाखांचा दंड वसूल

Ganesh Kumar Mule Oct 23, 2026 8:38 PM

PMC Health Department | कायाकल्प प्रकल्पात पुणे महानगरपलिका सर्वोत्कृष्ट
PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेच्या कार्ड साठी नागरिकांना करावे लागणारे हेलपाटे झाले कमी!  | ऑनलाईन सुविधा केल्याने नागरिकांना होतोय फायदा 
PMC Health Department | कीटकजन्य आजारांबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती 

Pune Dengue Cases 2026  | पुण्यात डेंग्यूचा उद्रेक! १० महिन्यांत २,४१३ रुग्ण; महापालिकेची धडक मोहीम, ६.३० लाखांचा दंड वसूल

|ऑगस्टमध्ये ५६८, सप्टेंबरमध्ये ७२६, तर ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत ५५३ रुग्णांची नोंद; डेंग्यूच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात ५० खाटांची मोफत सुविधा

 

Pune Dengue Outbreak – The Karbari News Service–  पुणे शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. जानेवारी ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शहरात डेंग्यूचे तब्बल २ हजार ४१३ रुग्ण आढळले आहेत. डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने सुमारे १४ लाख घरांची तपासणी केली असून, अळ्या आढळलेल्या ठिकाणी कारवाई करत ६ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, डेंग्यू प्रतिबंध, रुग्णालयांतील उपचार व्यवस्था आणि क्षेत्रीय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. (Pune PMC News)

| सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ७२६ रुग्ण

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ५६८, सप्टेंबरमध्ये ७२६, तर १ ते २० ऑक्टोबरदरम्यान ५५३ रुग्ण आढळले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी केलेल्या तपासणीत सुमारे १४ लाख घरांना भेटी देण्यात आल्या. यावेळी २८ लाख ३१ हजार ३८६ पाण्याचे साठे आणि कंटेनर तपासण्यात आले. त्यापैकी १३ हजार घरांमधील १८ हजार ८८५ कंटेनरमध्ये एडीस डासांच्या अळ्या आढळल्या. याप्रकरणी २ हजार ६६४ मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ६ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

| डेंग्यूची मोफत तपासणी; नायडू रुग्णालयात ५० खाटा

डेंग्यूच्या रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये रॅपिड डायग्नोस्टिक किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. नायडू रुग्णालय, डॉ. कोटणीस रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालय या सेंटिनेल केंद्रांमध्ये नमुने पाठवून मोफत खात्रीशीर चाचण्यांची सुविधाही उपलब्ध आहे.

डेंग्यूच्या उपचारासाठी डॉ. नायडू रुग्णालयात ५० स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी दररोज १० ते १५ खाटा वापरात असून, सध्या ३५ खाटा रिक्त असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या रुग्णालयात डेंग्यूवरील उपचार पूर्णपणे मोफत आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना नायडू आणि कमला नेहरू रुग्णालयात तातडीने उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या रुग्णालयांत डेंग्यू उपचारासाठी ३३३ खाटा, तर खासगी रुग्णालयांत ४ हजार ४०९ खाटा उपलब्ध आहेत. यामध्ये अनुक्रमे सहा आणि ६७० अतिदक्षता विभागातील खाटांचा समावेश आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध असल्याने नागरिकांनी केवळ ठरावीक मोठ्या रुग्णालयांतच उपचार घेण्याचा आग्रह धरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

| हॉटस्पॉट भागांमध्ये फवारणी; अळीनाशकांचा वापर

ज्या भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक आढळत आहेत, तेथे औषध फवारणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. सरसकट उघड्या जागांवर धूरफवारणी करण्याऐवजी रुग्णाच्या घरात आणि लगतच्या बंदिस्त परिसरात प्रभावी पद्धतीने फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणीटंचाईमुळे नागरिकांकडून पाण्याचा साठा केला जात असल्याने, साठवलेल्या पाण्यात जैविक अळीनाशकांचा नियमित वापर करण्यावरही भर दिला जाणार आहे.

सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांनी डेंग्यू रुग्णांची माहिती IHIP पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुबार नोंद टाळण्याच्या सूचनाही रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

| घंटागाड्यांवरून जनजागृती; ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन

डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिकेकडून घंटागाड्यांवर ऑडिओ संदेशांद्वारे जनजागृती केली जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी गच्ची आणि पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्यात, यासाठी सोसायट्यांच्या अध्यक्षांना पत्रे पाठवण्यात येत आहेत. शाळांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धांद्वारेही विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जात आहे.

नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घरातील व परिसरातील पाण्याची भांडी रिकामी करावीत, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. डेंग्यूची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेत उपचार घ्यावेत आणि तपासणी पथकांना सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: