Mayor Manjusha Nagpure | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय आढावा बैठक संपन्न | कामे वेळत पूर्ण करण्याचे आदेश
Pune PMC News – (The Karbhri News Service) – महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेची महत्त्वपूर्ण प्रशासकीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन आगामी विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना कचरा संकलनासाठी लागणाऱ्या वाहनांची संख्या, चालकांची उपलब्धता तसेच ओला व सुका कचरा व्यवस्थापन (RDM) अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला. महसूल वाढीसाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेऊन प्रभावी बजेट नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील पार्किंग व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करून ऑनलाइन प्रणालीद्वारे नियंत्रण वाढविण्यावर भर देण्यात आला. मल्टी-लेव्हल पार्किंग प्रकल्प राबवून नागरिकांना अधिक सोयीस्कर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
पायाभूत सुविधांच्या दृष्टीने जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसेच नवीन इमारती उभारण्याबाबत चर्चा झाली. विविध प्रकल्पांच्या खर्च व व्यवहार्यता तपासून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील रस्ते व काँक्रीट पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला.आरोग्य क्षेत्रात मेडिकल कॉलेजमधील सुविधांचे उन्नतीकरण, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच पीपीपी (PPP) मॉडेलवर आधारित हॉस्पिटल प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी PET Scan सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर देण्यात आला. तसेच पीएमसी कॉलनी विकास (राजेवाडी, भवानी पेठ परिसर), बस थांबे आधुनिकीकरण तसेच विविध नागरी सुविधा विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. ग. दि. माडगूळकर सभागृह, भिडे वाडा, बाळासाहेब ठाकरे बाल नाट्यगृह तसेच सिंहगड रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे ऑडिओ-व्हिडिओ सुविधा उभारण्यास प्राधान्य देण्यात आले.या बैठकीत झोपडपट्टी निर्मूलन, वाहतूक सुधारणा तसेच विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व विभागांना नागरिकाभिमुख, पारदर्शक व वेळेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन केले.

COMMENTS