PMC Sanas Maidan Pass | सणस मैदानावर वैयक्तिक सरावासाठी मासिक ३०० ते ६०० रुपये पास! | चप्पल, खाद्यपदार्थ, पालकांना बंदी; दर रविवारी मैदान बंद

PMC Sanas Maidan Pass | खेळाडूंसाठी मासिक ३०० ते ६०० रुपये पास; चप्पल, खाद्यपदार्थ, पालकांना बंदी, रविवारी मैदान बंद

Homeadministrative

PMC Sanas Maidan Pass | सणस मैदानावर वैयक्तिक सरावासाठी मासिक ३०० ते ६०० रुपये पास! | चप्पल, खाद्यपदार्थ, पालकांना बंदी; दर रविवारी मैदान बंद

Ganesh Kumar Mule Nov 07, 2026 9:15 AM

Swachh Sanstha | Contract | स्वच्छ संस्थेच्या कराराची मुदत  5 वर्षांनी वाढवण्यात येणार! | स्थायी समिती समोर प्रस्ताव 
MWRRA | Pune Municipal Corporation | वाढीव पाण्याच्या तक्रारीबाबत MWRRA चा पुणे महापालिकेला दिलासा  | आता सुनावणी देखील घेण्याची गरज नाही 
PMC Employees Promotion | After many months of waiting, the PMC employees were finally promoted

PMC Sanas Maidan Pass | सणस मैदानावर वैयक्तिक सरावासाठी मासिक ३०० ते ६०० रुपये पास! चप्पल, खाद्यपदार्थ, पालकांना बंदी; दर रविवारी मैदान बंद

 

PMC Sport Committee – The Karbhari News Service –  कै. बाबुराव सणस मैदानावर वैयक्तिक सराव करणाऱ्या खेळाडूंना यापुढे मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पास घ्यावा लागेल. १८ वर्षांखालील खेळाडूंसाठी मासिक पास ३०० रुपये, तर १८ वर्षांवरील खेळाडूंसाठी ६०० रुपये प्रस्तावित आहे. सिंथेटिक ट्रॅक आणि मैदानाच्या वापराचे १८ नियम, तसेच प्रशिक्षक व खेळाडूंच्या शिस्तीचे नियमही धोरणात आहेत. महापालिका प्रशासनाने याबाबत धोरण तयार करून ते  क्रीडा समितीमार्फत स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर ठेवले आहे. (PMC Sport Department)

पासचे दर

१८ वर्षांखालील : मासिक ३००, तिमाही ९००, सहामाही १,७०० आणि वार्षिक ३,४०० रुपये.

१८ वर्षांवरील : मासिक ६००, तिमाही १,८००, सहामाही ३,५०० आणि वार्षिक ७,००० रुपये.

याशिवाय ओळखपत्रासाठी ५० रुपये स्वतंत्र शुल्क आहे. ओळखपत्र एका वर्षासाठी वैध असेल. दर तीन वर्षांनी शुल्कात २० टक्के वाढ होईल. एका सत्रात वैयक्तिक सराव करणाऱ्या खेळाडूंची संख्या जास्तीत जास्त ५० असेल.

कोण पात्र?

मागील दोन वर्षांची मान्यताप्राप्त राज्य/जिल्हा स्तरावरील कामगिरी तपासली जाईल.
१० वर्षे पूर्ण व त्यापुढील वयोगटातील खेळाडूच पात्र ठरतील.
निमंत्रित मॅरेथॉन आणि जनरल फिटनेससाठी मैदान व ट्रॅक दिला जाणार नाही.
कामगिरी व सहभागाचे प्रमाणपत्र, ओळखपुरावा, वयाचा पुरावा, दुखापतीची जबाबदारी स्वतःची असल्याचे आणि माहिती खरी असल्याचे प्रतिज्ञापत्र अशी कागदपत्रे द्यावी लागतील.

वेळा आणि स्पर्धा

सराव सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ४ ते ७ या सत्रांतच होईल. सकाळी ९ ते दुपारी ४ ही वेळ स्पर्धांसाठी राखीव आहे, सोमवार ते शनिवार. पालिकेच्या परवानगीनेच, फक्त अॅथलेटिक्स स्पर्धांसाठी मैदान दिले जाईल, त्यासाठी क्रीडा विभागाकडे अर्ज करावा लागेल. त्या काळात सराव करता येणार नाही. दर रविवारी देखभालीसाठी मैदान बंद राहील, कोणत्याही स्पर्धेसाठीही ते दिले जाणार नाही.

ट्रॅकवर काय करता येणार नाही?

खेळाडूंनी स्पोर्ट्स शूज घालूनच प्रवेश करावा. दैनंदिन वापरातील चप्पल किंवा बूट चालणार नाहीत.
ट्रॅक किंवा मैदानात कोणतेही खाद्यपदार्थ आणण्यास आणि खाण्यास सक्त मनाई आहे.
प्रशिक्षणार्थींचे पालक आणि नागरिकांना ट्रॅक किंवा मैदानावर कोणत्याही कारणासाठी प्रवेश नाही. चालण्यासाठीही कोणाला प्रवेश दिला जाणार नाही.
ट्रॅकवर वजनदार किंवा टोकदार वस्तू नेता किंवा ठेवता येणार नाहीत.
आतील पहिली लेन प्रशिक्षणासाठी वापरायची नाही. नियमित सरावासाठी १०० मीटर स्टार्टिंग पॉईंट वापरायचा नाही.
ज्या खेळप्रकारासाठी जो भाग राखीव आहे, तेथेच सराव करावा. भालाफेकीच्या सरावात मैदानाच्या दोन्ही बाजूंच्या रनवेचा वापर करावा.
गोळा, भाला, थाळी आणि हातोडा फेकीआधी, दरम्यान किंवा नंतर विनाकारण मैदानावर आपटू नयेत.
सरावाच्या वेळची स्वच्छता ही सर्वस्वी खेळाडू आणि प्रशिक्षकांची जबाबदारी असेल.

शिस्तीचे सर्वसाधारण धोरण

वैयक्तिक खेळाडू आणि प्रशिक्षकांनी क्रीडा विभागाकडून ओळखपत्र घेऊन ते प्रवेशावेळी कर्मचारी/सुरक्षारक्षकांना दाखवणे बंधनकारक असेल.
दुखापत किंवा अपघात झाल्यास जबाबदारी खेळाडू आणि प्रशिक्षकांची असेल, पालिका जबाबदार राहणार नाही.
मैदान परिसरात उत्तेजक पदार्थ घेण्यास सक्त मनाई आहे. आढळल्यास कारवाई होईल आणि अशा संस्था, क्लब किंवा खेळाडूंना भविष्यात सराव किंवा स्पर्धेसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
उपायुक्त (क्रीडा) आणि त्यांच्या नियंत्रणाखालील अधिकारी/कर्मचाऱ्यांसोबत प्रशिक्षक व खेळाडूंनी सहकार्याने वागावे आणि नियम व शिस्त पाळावी.

पुढे काय?

धोरणाला मुख्य सभेची मान्यता मिळाल्यावरच ते लागू होईल. सध्या मैदान मोफत उपलब्ध आहे, पण खेळाडूंच्या संख्येमुळे ट्रॅक खराब होत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. पास आणि प्रवेश निर्बंध यावर खेळाडू व पालक संघटना काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: