You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही!
PMC Employees – PMC Officers – (The Karbhari News Service) – गेल्या काही दिवसांपासून आणि वर्षांपासून पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यातील बरेचसे मृत्यू हे हृदय रोगांशी (Heart Attack) संबंधित होते. कमी वयात आणि नोकरीचा चांगला काळ सुरु असताना एखाद्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे असे अचानक निघून जाणे, हे नक्कीच वेदनादायक आहे. मात्र या गोष्टीला काही अंशी आपली जीवनशैली (Lifestyle) देखील कारणीभूत आहे. (Pune Municipal Corporation Employees and Officers)
काही आजारांचा अपवाद वगळता बरेचसे आजार हे चुकीच्या खाण्याने होतात. यात मधुमेह (Type 2 Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), अल्सर (Ulcer), पोटाचे विकार, यात तुमचाही दोष नाही. कारण तुम्हांला नेहमी चुकीचं मार्गदर्शन केलं जातं. तुमचा डॉक्टर तुम्हांला नीट मार्गदर्शन करू शकत नाही. तुम्ही बघितले असेल तुम्हांला मेडिसिन देणारे डॉक्टरांचेच पोट पुढे आलेले असते. त्यालाच चांगल्या आहाराबाबत माहित नसते. तो तुम्हांला काय सल्ले देणार? तो फक्त मेडिसिन देऊन तात्पुरती मलमपट्टी करणार.
याचाच अर्थ काय तर तुमच्या आरोग्याची काळजी कुणीही घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आधी तुम्हाला तुम्ही स्वतः किती महत्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. हे फक्त तुमच्या कुटुंबा पुरते मर्यादित नाही. हे तुमच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. तुम्ही या जगात अस्तित्वात असणे, हे सगळ्यात मोठं prize आहे. त्या गोष्टीचा आदर करा. स्वतःचा सन्मान करा. वेळ निघून जाण्याआधी हे तुम्हांला लक्षात घ्यावे लागेल. तुमची नोकरी आणि पैसा देखील तुमच्यापेक्षा मोठा नाही. या गोष्टी महत्वाच्या आहेतच. पण सगळ्यात महत्वाचे तुम्ही आहात. स्वतःच्या असण्याचा आदर करा आणि एक चांगली जीवनशैली जागा.
त्यासाठी या गोष्टींवर आजपासूनच अंमल करायला सुरुवात करा.
1. साखर, कर्बोदके टाळा (Stay Away from Sugar, Carbohydrates)
तुमची जीवनशैली ही तुमच्या आहारापासून सुरु होते. तुमच्या पोटात पोषणयुक्त अन्न जाते कि नाही, यावर तुम्हांला बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. कारण आज तुमच्यापैकी बरेच लोक जे खातात, त्या सगळ्यात साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. परिणामी इन्सुलिन लेव्हल वाढते. त्याचाच अर्थ रक्तातील साखर वाढत जाते. त्यामुळेच पुढे लठ्ठपणा, डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, अशा आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याचे जे मूळ आहे साखर आणि कर्बोदके, ते तुम्हांला आहारातून कमी करावे लागेल. पोषणयुक्त अन्न खायला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यासाठी प्रोटीन आणि आरोग्यदायी फॅट यांना आहारात महत्वाचे स्थान द्यावे लागेल. यामध्ये अंडी, मटण, मासे, सगळ्या पालेभाज्या यांचा समावेश आहे. तसेच पनीर, बटर, चीज, दही यांचे आहारात प्रमाण वाढवावे लागेल.
2. तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी तेल कुठले वापरता? (Stay Away from Seed Oil)
तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, आम्ही बाहेरचे अन्न टाळतो. घरीच शिजवून खातो. तरीही आमचे पोट वाढते. याला प्रमुख दोन कारणे. एक म्हणजे आहारात असलेले पिष्टमय पदार्थ आणि साखरेचे प्रमाण आणि दुसरे म्हणजे तुमचे तेल. तुम्ही जर स्वयंपाकासाठी सोयाबीन, सूर्यफूल, अशी seed oil वापरत असाल तर तुमचा लठ्ठपणा हा वाढतच राहणार आहे. हे मूळच तुम्ही घरातून हद्दपार करा. त्यासाठी तुमचे अन्न तुम्ही coconut oil, तूप, बटर यात शिजवा. तुम्हांला घाण्याचे शेंगदाणा तेल मिळत असेल तर उत्तमच आहे.
3. ब्रेकफास्ट टाळाच (Skip Breakfast)
तुमच्या शरीरासाठी ब्रेकफास्ट गरजेचा नसतोच. हे विज्ञान देखील सांगतं. मात्र आपण पाश्चिमात्य जीवनशैली अंगिकारली आहे. आपण त्यांचेच अनुकरण करतो आणि मग सकाळ पासूनच रक्तातील साखर वाढवत राहतो. तुमच्या रक्तातील साखर ही सकाळी आधीच high असते. रिकाम्या पोटीच तुम्ही व्यायाम करायला हवाय. भारतीय संस्कृतीत किंवा पूर्वीच्या काळी लोक बघा दिवसातून दोनच वेळा जेवण करायचे. दुपारी आणि सायंकाळी. आणि याच जेवणाच्या प्रमाणवेळा आहेत. ब्रेकफास्ट वर खर्च करू नका. तुम्हांला सकाळी भूक लागत नाही. सवय लागली म्हणून तुम्ही खाता. ज्या लोकांना शेतात जाऊन नांगर चालवायचा असतो त्यांना ब्रेकफास्ट ची गरज असते. तुम्हांला बिलकुल नाही. आजपासूनच यावर अंमल करायला सुरुवात करा.
4. उपवास करा (Fasting/ Intermittent fasting)
उपवास करा, याचा चुकीचा अर्थ लावू नका. उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी आणि फराळाचे पदार्थावर ताव मारणे नव्हे. आपल्याला हेच सांगितलं जाते. मात्र उपवासा मागचे विज्ञान समजून घ्या. उपवासाचा अर्थ आहे कि तुम्ही जाणूनबुजून काही काळासाठी पोट रिकामे ठेवणे. यात 14 तासांपासून ते 24 तास, 72 तास, 120 तासांचा समावेश आहे. तर तुम्ही 14 तासांपासून आजपासूनच सुरुवात करा. हळूहळू तास वाढवा. या काळात काही खायचं नाही. फक्त प्यायचं. ते ही पाणी, मीठ पाणी, ब्लॅक कॉफी (Without Sugar), ब्लॅक टी (Without Sugar), ग्रीन टि आणि ऍपल सीडार व्हिनेगार. असं केलं तरच उपवास फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही 24 तास 48 तास उपवास केला तर तुमचे वजन तर कमी होणारच आहे. शिवाय तुमचे पोटाचे विकार दूर होतील. एकूणच आरोग्य सुधारेल, फोकस वाढेल, आयुष्यमान वाढेल. ही गोष्ट गंभीरपणे घ्या. त्यासाठी तुम्हांला जेवणाच्या वेळा ठरवाव्या लागतील. संध्याकाळी तुम्हांला 7 च्या आत जेवण संपवावे लागेल. फार तर 8 वाजता. त्यापुढे नाही. सकाळी ब्रेकफास्ट नाही. सरळ जेवण. तेही दुपारी. समजा रात्री 8 ला तुमचे जेवण झाले असेल आणि दुपारी 12 वाजता तुम्ही जेवण केले तर मधला 16 तासाचा काळ ही तुमचा झाला फास्टिंग. 16 तास नसेल जमत तर 14 तास करा. पण हळूहळू वाढवत न्या. 24 तास, 48 तासाचे ध्येय ठेवा. आजपासून सुरुवात करा आणि बघा पुढील तीन महिन्यात फरक पडतो की नाही ते.
5. व्यायाम करा पण जिम ला जाऊनच (Gym Exercises)
तुमच्या शरीराला व्यायाम ही गरज आहे. कारण जसे तुमचे वय वाढत जाते, तसे स्नायू ठिसूळ होत जातात. त्यात तुमच्यातील बऱ्याच लोकांना बैठे कामच असते. स्नायूंना मजबूत करण्यासाठी तुम्ही व्यायाम करणे महत्वाचे आहे. आणि व्यायाम हा वजन उचलण्याचाच असायला हवाय. त्यासाठी जिम गरजेची असते. वय जसे वाढत जाते, तसे हा वजन उचलण्याचा व्यायाम महत्वाचा असतो. असे केले तरच तुम्ही फिट राहू शकता. चालणे तर महत्वाचे आहेच. पण सोबत आठवड्या तुन तीन वेळा तुम्ही जिम ला जाऊन वजन उचलायला हवंय. वेळेची कारणे देऊ नका. जिम परवडत नसेल तर Push up, squats, Wall sits, किमान असे व्यायाम करा. पण काहींना काही हालचाल करा.
6. पुस्तके वाचा, जर्नल लिहा (Read Books, Journal)
वरील सगळ्या गोष्टी या तुमच्या शारीरिक आरोग्याशी निगडित आहेत. त्या सोबतच तुमच्या मनाचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचण्यापासून सुरुवात करा. हा सगळ्यात फायदेशीर मानसिक व्यायाम आहे. तुम्हांला आवडत नसेल तर पुस्तक वाचनाची आवड लावून घ्या. तुम्ही काहीही वाचू शकता. कादंबरी, कथा संग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक विषयक, विज्ञान विषयक असे सगळे साहित्य वाचा. एक वेळ ठरवून घ्या. किमान अर्धा तास ते एक तास तुम्ही दररोज पुस्तक वाचायलाच हवं. लिहिण्याची आवड जोपासा. साहित्यपर लिहिणं गरजेचं नाही. तुमचे विचार लिहून काढा. एखादी समस्या सतावत असेल तर ती लिहून काढा. बघा तुम्हांला उत्तर मिळते का नाही? ध्यान करा. तुमच्या अंतर्मनाचा अभ्यास करा. त्याला कामाला लावा.
7. बचत करा, गुंतवणूक करा (Save and Invest)
तुम्हांला बचतीची सवय असायला हवीय. अनावश्यक गोष्टीवर तुम्ही खर्च हा टाळायलाच हवा. त्याचसोबत तुम्ही गुंतवणूक करायला हवीय. फंड काय असतात, स्टॉक मार्केट काय आहे. हे शिकून घ्या. त्याचा अभ्यास करा. तुम्ही तुमच्या गावी जमीन विकत घ्या. दुसरं घर घ्या. काहीही करा पण पैसे उधळू नका. पैसे कमी असतील तर बचत करा. जास्त असतील तर गुंतवणूक करा.
8. पैशाचे स्रोत वाढवा (Raise your income streams)
तुम्हांला तुमच्या नोकरीतून पैसे मिळतात. ही चांगलीच गोष्ट आहे. पण फक्त त्याच पैशावर अवलंबून राहू नका. नवीन स्रोत वाढवा. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही अनैतिक मार्गाने पैसे मिळवा. तुमच्या नोकरीचा गैरफायदा घ्या. तसे करू नका. कर्माची फळे, ही संकल्पना लक्षात ठेवा. चांगल्या मार्गाने पैसे मिळवा. आजकाल खूप चांगले ऑनलाईन मार्ग आहेत. ते शोधा. त्याचा अभ्यास करा. ऑनलाईन कोर्स करा. नवीन कौशल्य शिकून घ्या.
9. वरिष्ठांचा सन्मान करा (Honor the seniors)
तुम्ही कुठल्याही खात्यात कामाला असा, जुनियर असा, सिनियर असा, तुम्हांला कुणीतरी वरिष्ठ असणारच. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सन्मान करायला हवाय. तुम्ही वरिष्ठाना आव्हान देऊ नका. त्याने तुमचेच मानसिक नुकसान होते. वरिष्ठ कसा का असेना तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा. बाकी सूड उगवण्याचं काम नियतीवर सोपवून द्या. मात्र नसते ताण घेऊन आजारांना निमंत्रण देऊ नका. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा. एकूणच तुमच्या व्यक्तिमत्वासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.
10. जमिनीवर या! (Grounding, Earthing)
जमिनीवर या, याचा अर्थ इथे वेगळा आहे. म्हणजे तुम्ही जमिनीशी, निसर्गाशी नाते जोडा. दर रविवारी किमान अर्धा तास ते 1 तास अनवाणी चाला. वाळू, माती किंवा गवत कशावरही चाला. याने तुमच्य. पायाचे Biomechanics सुधारेल. जमिनीवर झोपा. बेडवर नाही. हे दररोज करा. डोक्याखाली उशी सुद्धा घेऊ नका. बघा तुमची पाठदुखी कशी पळून जाईल.
या सगळ्या गोष्टी वाचायला तशा सोप्या आहेत. मात्र प्रत्यक्षात अंमल करताना कळेल किती अवघड आहे ते. पण हीच आपली जीवनशैली असायला हवीय. यावरच तुम्ही अभ्यास करायला हवाय.