Rahul Gandhi on Maharashtra Election | राहुल गांधी यांच्या लेखाने भाजप हादरले | १२ ते १४ जूनला राज्यभर काँग्रेसचे मशाल मोर्चे
| फडणवीसांचे उत्तर महाराष्ट्राची दिशाभूल करणारे -कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी
BJP Vs Congress – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रातील भाजप युती सरकार मतदानाच्या चोरीचा पॅटर्न वापरून सत्तेवर आले आहे. यावर प्रकाशझोत टाकणारा लेख लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी वर्तमानपत्रात लिहीला, त्यामुळे भाजप नेते हादरले. या लेखाला उत्तर देणारा मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख हा मूळ मुद्द्याला बगल देऊन, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. (Mohan Joshi Pune Congress)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लेखामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दलच आक्षेप घेतले आहेत. यावर निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित असताना मुख्य मंत्री फडणवीस उत्तर का देत आहेत? त्यांच्या लेखामुळे निवडणूक घोटाळ्याबाबतचा संशयच बळावला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घटनेत बदल केला. निवड समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश या तिघांचा समावेश असे. पण, घटनेत बदल करून मोदी यांनी सरन्यायाधीशांना बाजूला केले आणि त्याजागी गृहमंत्री अमित शहा यांची नेमणूक केली. निवड समितीवर वर्चस्व मिळवले. मोदी यांच्या या डावपेचातूनच निवडणूक घोटाळ्याची सुरूवात झाली. याबाबत फडणवीस यांच्या लेखात अवाक्षरही का नाही? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षाने निवडणूक आयुक्त नेमताना पारदर्शक भूमिका घेतली, राजकीय हस्तक्षेप केला नाही आणि त्यांनी नेमलेल्या निवडणूक आयुक्तांबाबत कोणीही आक्षेप घेतले नाहीत. ही वस्तुस्थिती फडणवीस यांनी हेतुत: नजरेआड केली आणि लेखामध्ये उथळ आरोप केले. जनतेची दिशाभूल केली. २०२४ साली विधानसभेसाठी मतदारांची संख्या वाढली याबद्दल महाराष्ट्रातील जनतेत आजही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मतदानाची वेळ संपल्यावरही काही ठराविक मतदारसंघात मतदान झाले. त्याबाबतही फडणवीस यांनी बगल दिलेली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे, लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे, हे लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेस १२ ते १४ जूनला राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.
COMMENTS