लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्रात १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करावे..
: नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२२ पासून वय वर्षे १५ ते वय वर्षे १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशास अनुसरून पुणे शहरामध्ये देखील लसीकरण सुरु होणार असून त्याअंतर्गत पुणे शहरातील ५ लसीकरण केंद्रे सुरु होणार असल्याचे समजते.
प्रभाग क्र. १९ मध्ये सावित्रीबाई फुले मराठी मिडीयम शाळा, रफिक अहमद किडवाई उर्दू मिडीयम शाळा, आकांक्षा फौंडेशन इंग्लिश मिडीयम शाळा, लहूजी वस्ताद साळवे माध्यमिक शाळा, संत हर्कादास स्कूल या पाच शाळा येत असून त्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. तसेच प्रभागामध्ये या वयोगटातील मुला-मुलींची संख्या खूप मोठी आहे. तसेच भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत शाळा न शिकणाऱ्या मुला-मुलींची संख्या देखील जास्त आहे. याव्यतिरिक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत इतर शाळा देखील जास्त आहेत.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये विविध कामकाजासाठी दैनंदिन येणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा मोठी आहे. यामुळे प्रभाग क्र. १९ मधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र, काशेवाडी येथे या वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी नगरसेविका, भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना तुषार पाटील यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि आरोग्य विभाग प्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रभाग क्र. १९ मधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र, काशेवाडी, ठिकाणी सध्या याठिकाणी वय वर्षी १८ च्या वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरु असून त्याच ठिकाणी वय वर्षे १५ ते वय वर्षे १८ या वयोगटातील मुलांना सुद्धा याच ठिकाणी लसीकरण सुरू केले तर जास्तीत जास्त लसीकरण होईल असे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले.
COMMENTS