शहरातील छोट्या व्यावसायिकांना दिलासा!
: दिवाळीच्या सणात कडक कारवाई नाही
पुणे: दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त शहरात लगबग सुरु आहे. या कालावधीत छोटे व्यावसायिक रस्त्यावर पथारी ठेवत वेगवेगळ्या वस्तू विक्रीस ठेवतात. मात्र या लोकांकडे पथारीचा परवाना नसल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. यामुळे या लोकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका अर्चना पाटील यांनी व्यावसायिकांवर कडक कारवाई न करता त्यांना फक्त समज देऊन सोडून देण्यात यावे. अशी मागणी केली होती. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनास कडक कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे छोट्या व्यावसायिकांना दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे.
: नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली होती मागणी
शहरात सद्यस्थितीत कोरोनाचा जोर कमी झालेला असला तरी शहरातील छोट्या व्यावसायिकांचे मात्र कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी दिवाळीच्या सणाला या व्यावसायिकांची फार मोठी उलाढाल झाली नव्हती. खास करून वर्षभरात साजरा होणाऱ्या विविध सणांसाठी छोटे व्यावसायिक पथारी मांडत वेगवेगळ्या वस्तू विक्रीस ठेवतात. हे लोक शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथ वर व्यवसाय करतात. यामुळे शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय यांच्याकडे पथारी चा परवाना देखील नसतो. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यांचे पथारी सहित सर्व सामग्री उचलून नेली जाते. हे सोडवण्यासाठी त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला जातो. त्यामुळे दिवाळी च्या सणाला या व्यावसायिकांवर अशा पद्धतीची कारवाई करू नये. अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. या व्यावसायिकांवर कडक कारवाई न करता त्यांना फक्त समज देऊन सोडून देण्यात यावे. असे ही पाटील यांनी सांगितले होते. याला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तसे आदेश अतिक्रमण विभागाला दिले.
यामुळे छोट्या व्यावसायिकांना दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे.
COMMENTS