Pune Water Supply | धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा परिसरात पिवळसर पाण्याबाबत पाणीपुरवठा विभागाचा खुलासा

Homeadministrative

Pune Water Supply | धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा परिसरात पिवळसर पाण्याबाबत पाणीपुरवठा विभागाचा खुलासा

Ganesh Kumar Mule May 26, 2026 10:36 PM

PMC Ward 4 Kharadi Wagholi | प्रभाग क्रमांक ४ -खराडी वाघोली  | आपले घर सोसायटी पासून ते उबाळे नगर पर्यंत आहे या प्रभागाची व्याप्ती | जाणून घ्या कसा आहे प्रभाग 
 Pune Sex Ratio |  Only 890 girls for every 1 thousand boys in Savitribai’ Phules Pune!
PMC Ward Office Stregnthening | क्षेत्रीय कार्यालये अधिक बळकट करण्याच्या प्रस्तावाला मान्यता  | क्षेत्रीय अधिकारी, परिमंडळ उपायुक्त यांना महापालिका आयुक्तांनी दिले हे अधिकार! | अधिकार असताना आता प्रकरण वरिष्ठांना पाठवले तर होणार कारवाई

Pune Water Supply | धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा परिसरात पिवळसर पाण्याबाबत पाणीपुरवठा विभागाचा खुलासा

– “पाणी पिण्यायोग्य, तरी उकळून प्यावे”

| भामा आसखेड धरणातील अशुद्ध पाण्याचा रंग वाढल्याने समस्या

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) : धानोरी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, येरवडा, वडगाव शेरी व नगर रोड परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारीनंतर पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अधिकृत खुलासा केला आहे. भामा आसखेड धरणातून कुरुळी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या अशुद्ध पाण्याचा रंग वाढल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.

पावसामुळे धरणातील पाण्याचा रंग वाढला

मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे पासून या परिसरात झालेल्या पावसानंतर धरणातून येणाऱ्या अशुद्ध पाण्याचा रंग वाढला आहे. यापूर्वी अशुद्ध पाण्याचा रंग ५ ते १० हॅझन युनिट इतका होता. मात्र ११ मे पासून तो टप्प्याटप्प्याने वाढून ३० ते ४० हॅझनपर्यंत पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी कमी होणे, पावसाळी वातावरण व शेवाळ वाढणे यामुळे अशुद्ध पाण्यास अधिक प्रमाणात पिवळसर रंग आला आहे.

शुद्धीकरणानंतरही रंग कायम

जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यानंतरही पाण्यातील पिवळसरपणा पूर्णपणे कमी होण्यास कालावधी लागत आहे. सामान्यतः शुद्ध पाण्याचा रंग ४ ते ५ हॅझन दरम्यान असतो. मात्र सध्या तो १० ते १५ हॅझनपर्यंत आढळत आहे. यावर उपाय म्हणून ॲलम (तुरटी) डोझिंगचे प्रमाण वाढवण्यात आले असून पिवळसरपणा कमी करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. सध्या शुद्ध पाण्यातील रंग १० हॅझनपर्यंत कमी करण्यात आला आहे.

३ ते ४ दिवसांत परिस्थिती सामान्य होणार

कुरुळी जलशुद्धीकरण केंद्र ते प्रत्यक्ष वितरण व्यवस्थेतील जलटाक्या यामधील मोठे अंतर विचारात घेता, यापूर्वी वितरित झालेल्या जास्त रंगाच्या पाण्याचे अवशेष वितरण यंत्रणेत शिल्लक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जलटाक्या, वितरण यंत्रणा व पाईपलाईनमधील रंगाचा पूर्णपणे निचरा होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे मनपाने म्हटले आहे.

पाणी पिण्यायोग्य, तरी खबरदारी घ्या

पाण्याची तपासणी केली असता जलकेंद्र स्तरावर पाण्याचा रंग IS 10500:2012 मानकांपेक्षा किंचित जास्त आढळत असला तरी त्यात सातत्याने सुधारणा होत आहे. पाण्यातील रेसिड्युअल क्लोरिन व इतर रासायनिक घटक IS 10500:2012 प्रमाणे योग्य आहेत. पाण्यात जिवाणू आढळलेले नाहीत. त्यामुळे सदर पाणी पिण्यायोग्य आहे, असे मनपाने स्पष्ट केले.

मात्र काही भागांमधून आलेल्या दूषित पाण्याच्या तक्रारींमध्ये स्थानिक वितरण व्यवस्थेमध्ये दोष आढळले असून त्यांचा जलशुद्धीकरण केंद्राशी संबंध नाही. त्या भागात पाणीपुरवठा विभागामार्फत दुरुस्तीची कार्यवाही सुरू आहे.

नागरिकांना आवाहन

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: