Pune Congress on Oil Prices | इंधन दरवाढीविरोधात पुणे काँग्रेसचा एल्गार; नव्या शहराध्यक्षांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

HomeBreaking News

Pune Congress on Oil Prices | इंधन दरवाढीविरोधात पुणे काँग्रेसचा एल्गार; नव्या शहराध्यक्षांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Ganesh Kumar Mule May 26, 2026 9:10 PM

NCP activists show black flags | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे 
Supriya Sule | महागाईकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहे | खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप
Video : Smriti Irani Vs Congress : तोंड उघड बया, तोंड उघड… महागाई विरोधात तोंड उघड

Pune Congress on Oil Prices | इंधन दरवाढीविरोधात पुणे काँग्रेसचा एल्गार; नव्या शहराध्यक्षांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

| “अच्छे दिन फक्त उद्योगपतींना, जनता महागाईत होरपळतेय” म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल

 

Pune Congress – (The Karbhari news Service) –  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असतानाही युद्धाचे कारण पुढे करून केंद्र सरकारने इंधन दरवाढीचा बोजा सामान्यांवर टाकल्याचा आरोप करत पुणे शहर काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप (पूर्व) व दीप्ती चवधरी (पश्चिम) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोदी सरकारविरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला.  (Pune News)

शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशांत जगताप व दीप्ती चवधरी यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच मोठे आंदोलन होते. महागाईच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसने रस्त्यावर उतरून सरकारला आव्हान दिले. विशेष म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मोठ्या संख्येने सामान्य पुणेकर नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.

“अच्छे दिनचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदींनी देशाची सत्ता हस्तगत केली. मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी फक्त बड्या उद्योगपतींनाच अच्छे दिन दिले. सामान्य जनता महागाईचे चटके सोसत आहे. कच्च्या तेलाच्या किमती गडगडलेल्या असताना उद्योगपती मित्रांची तिजोरी भरण्यासाठी युद्धाचे कारण पुढे करून इंधन दरवाढ लादली जात आहे,” असा घणाघात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केला.

या आंदोलनात माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, पश्चिम शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, मनपा गटनेते चंदू कदम, नगरसेविका दिपाली डोख, सुनील शिंदे, अश्विनी लांडगे, मजहर मणियार, महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, पप्पू घोलप यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नुकतीच शहराध्यक्षपदाची फेररचना झाल्यानंतर काँग्रेसने महागाईच्या मुद्द्यावरून थेट रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या नेतृत्वाने पक्षात उत्साह संचारल्याचे चित्र या आंदोलनातून दिसून आले. इंधन दरवाढ, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती काँग्रेसने आखल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: