Pune Water Issue | पुणे उत्तर-पूर्व भागातील गढूळ आणि पिवळसर पाणी समस्या दोन दिवसांत सुटणार | आयुक्त नवल किशोर राम यांची कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राला भेट
| तज्ञांची १० जूनला पाहणी, MSEDCL सोबत बैठक घेण्याचे आदेश
Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या उत्तर-पूर्व भागात गढूळ आणि पिवळसर पाणी, कमी दाबाने आणि कमी वेळेत होणारा पाणीपुरवठा या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज, ९ जून २०२६ रोजी प्रभाग क्र. १, २ आणि भामा आसखेड प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
नागपूरचाळ, मुंजाबा वस्ती, धानोरी या भागातील नागरिक आणि स्थानिक सभासदांनी पाणीपुरवठ्याबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यानुषंगाने आयुक्तांनी थेट कुरुळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. (Naval Kishore Ram IAS)
तक्रारींचे दोन दिवसांत निराकरण करणार पाहणीवेळी सभासद अश्विनी भंडारे, संगीता दांगट, अनिल टिंगरे, नंदिनी धेंडे, रवी उर्फ हर्षल टिंगरे, शितल सावंत, सुहास टिंगरे, अनिल सातव, रामदास दाभाडे उपस्थित होते. त्यांनी आपापल्या प्रभागातील पाण्याच्या समस्यांबाबत आयुक्तांसमोर मांडणी केली.

आयुक्त नवल किशोर राम यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. सद्यस्थितीत येणाऱ्या गढूळ आणि पिवळसर पाण्याच्या तक्रारींसाठी तज्ञांची मदत घेऊन पुढील दोन दिवसांत निराकरण करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार तज्ञ १० जून रोजी पाहणी करणार आहेत. तज्ञांच्या अहवालानंतर तात्काळ योग्य उपाययोजना राबवण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.
भामा आसखेडच्या वीजपुरवठ्यासाठी MSEDCL सोबत बैठक भामा आसखेड प्रकल्पाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्याबत MSEDCL च्या अधिक्षक अभियंत्यांसोबत बैठक घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. जोपर्यंत भामा आसखेड प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या भागात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन तूर्त करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या पाहणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप, भामा-आसखेड प्रकल्प व्यवस्थापक रामदास तारु, अविनाश सपकाळ, विजय केळकर, एकनाथ गाडेकर तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि जलशुद्धीकरण केंद्राचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS