Pune Potholes | सायकल मार्गांचे जाळे उभारा; मात्र ती सायकल पुणेकरांनी खड्ड्यातून चालवायची का? | प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिका आयुक्तांना सवाल
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – पुणे शहरात एकूण ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारण्याचा संकल्प महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे. यावरून शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांचे लक्ष शहरातील खड्ड्यांकडे वेधले आहे. सायकल मार्गांचे जाळे उभारणे ही चांगली गोष्ट आहे, मात्र ती सायकल पुणेकरांनी खड्ड्यातूनच चालवायची का, असा सवाल भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांना केला आहे. (PMC Road Department)
पुणे हे आपल्या समृद्ध सायकल संस्कृतीसाठी ओळखले जाते. आता ही परंपरा पुन्हा उजळविण्याची आणि पुण्याला भारताची सायकल राजधानी बनविण्याची वेळ आली आहे. आमचे उद्दिष्ट संपूर्ण शहरभर सुमारे ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणे आहे, ज्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वार सुरक्षितपणे प्रवास करू शकतील,” असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच सांगितले होते.
यावरून प्रमोद भानगिरे यांनी शहरातील मूलभूत समस्यांकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. भानगिरे यांनी म्हटले आहे की, सायकल मार्गांचे जाळे उभारण्याच्या आयुक्त यांच्या संकल्पनेचे स्वागत आहे. पुण्यासारख्या शहरांसाठी ही भूषणावह गोष्ट आहे. मात्र सायकल चालवण्यासाठी शहरात एकतरी रस्ता गुळगुळीत आहे का, याकडे देखील महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे. भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे की, शहराचा मध्यवर्ती भाग असो, उपनगरे असो किंवा नुकतीच समाविष्ट झालेली गावे असो, यातील मुख्य रस्ते तसेच गल्ली बोळातील रस्त्यावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे आधी बुजविणे आणि त्यांची दुरुस्ती करणे, याला प्राधान्य द्यायला हवे. पुणेकर नागरिक आज जीव मुठीत घेऊन रस्त्यातून जात आहेत. अशा वेळी चांगले रस्ते देणे ही प्राथमिकता असायला हवी. याकडे महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

COMMENTS