Pune News | गणेशोत्सवापूर्वी पुण्यात हाय-लेव्हल ॲक्शन! | आमदार, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची मिरवणूक मार्गावरून संयुक्त पाहणी
Pune Ganeshotsav – (The Karbhari News Service) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कसबा आणि विश्रामबाग वॉर्डातील प्रमुख मिरवणूक मार्गावर आज आमदार हेमंत रासणे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संयुक्त पाहणी करत रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. (Pune Breaking News)
नागरिक व भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत सुविधा मिळाव्यात यासाठी ही विशेष पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्यांवरील खड्डे, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, पदपथ, अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला आणि त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.
कसबा गणपतीपासून दगडूशेठपर्यंत पाहणी –
या पाहणीला कसबा गणपती मंदिरापासून सुरुवात झाली. शिवाजी रोड मार्गे भाऊ रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, केळकर रोड, पासोड्या विठोबा मंदिर, सोन्या मारुती मंदिर, सोमेश्वर मंदिर, रांका ज्वेलर्स, महाराणा प्रताप रस्ता मार्गे कस्तुरी चौक, जैन मंदिर, नाईक हॉस्पिटल मार्गे फडगे पोलीस चौकी, सेवा मित्र मंडळ, मंडई गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती देखावा, गुरुजी तालीम, लक्ष्मी रस्ता, पुरम चौक या संपूर्ण प्रमुख मिरवणूक मार्गाची आणि परिसराची पाहणी करण्यात आली.
अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश –
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी काँक्रीट व डांबरी रस्त्यांवरील खड्डे, महावितरणच्या केबल खोदाईनंतर अपूर्ण राहिलेली रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज लाईनमधील गळती, तुंबलेल्या वाहिन्या आणि पदपथावरील अडथळा ठरणारे विद्युत डीपी बॉक्स निदर्शनास आले.
यावर आयुक्तांनी ठोस निर्देश दिले –
*१. खड्डेमुक्त रस्ते:* कसबा, मंडई आणि स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसरात मोठी गर्दी होणार असल्याने तेथील रस्ते प्राधान्याने खड्डेमुक्त करण्याचे आदेश. पथ विभागाने प्रत्यक्ष देखरेख ठेवून दर्जात्मक दुरुस्ती करावी.
*२. नो-डिगिंग:* पाणीपुरवठा, ड्रेनेज, महावितरण आणि इतर युटिलिटी विभागांनी गणेशोत्सव संपेपर्यंत नवीन रस्ते खोदाई करू नये आणि आधीच्या खोदाईची कामे पूर्ण करून रस्ते समतल करावेत.
*३. विद्युत सुरक्षा:* उघड्या तारा सुरक्षित कराव्यात आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे डीपी बॉक्स हटवण्याची कार्यवाही करावी.
*४. वाहतूक नियोजन:* उत्सव काळात प्रचंड गर्दी लक्षात घेऊन महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने वाहतूक सुरळीत ठेवावी.
या संयुक्त पाहणीवेळी मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, उपायुक्त (अतिक्रमण) सोमनाथ बनकर, उपायुक्त (घनकचरा) संतोष वारुळे, अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, सहायक आयुक्त मुल्ला, राजेश गुर्रम तसेच महावितरणचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS