PMC Tender News | पुणे महापालिकेतील A, B, C, D उपभागनिहाय टेंडर पद्धत बंद करा; कथित संगनमताची चौकशी करण्याची मागणी
| प्रभागाचे संपूर्ण बजेट एकत्रित करण्याची मागणी; ‘टेंडर भरू नका’ म्हणून एजंटांकडून फोन होत असल्याचा आरोप
Pune Municipal Corporation – The Karbhari News Service : पुणे महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये अ, ब, क, ड (A, B, C, D) अशा उपभागनिहाय टेंडर काढण्याची पद्धत बंद करून संपूर्ण प्रभागाचे बजेट एकत्रित करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र दिले आहे. तसेच निविदा प्रक्रियेत कथित संगनमत होत असल्याच्या तक्रारींची गंभीर चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रभागातील विविध कामांसाठी उपभागनिहाय निविदा काढल्या जात असल्याबाबत आक्षेप घेत, ही पद्धत चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या संदर्भातील कायदेशीर बाबींची तपासणी करून निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
‘टेंडर भरू नका’ म्हणून एजंटांचे फोन?
निविदा प्रक्रियेबाबत पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. A, B, C, D या उपभागांसाठी काही एजंट ठेकेदारांना फोन करून टेंडर भरू नका, असा दबाव आणत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाल्याचे पत्रात म्हटले आहे.
प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे चार-चार एजंट फोन करत असल्याचे नागरिकांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार खरा असल्यास तो गंभीर स्वरूपाचा असून, यामागील कथित संगनमताची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभागाचे संपूर्ण बजेट एकत्रित करा
प्रत्येक प्रभागाला दिले जाणारे संपूर्ण बजेट एकत्रित असावे. त्या बजेटमधून कोणती कामे करायची, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आणि निधी कुठे खर्च करायचा, हे संबंधित प्रभागातील चारही नगरसेवकांनी एकत्रितपणे ठरवावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
तसेच ‘विविध ठिकाणी काम करणे’ या हेड बजेटमधून निधी खर्च करण्याची पद्धत बंद करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
संपूर्ण बजेट सार्वजनिक पोर्टलवर टाकण्याची मागणी
महापालिकेच्या प्रभागनिहाय बजेटची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी संपूर्ण बजेट गुगल किंवा सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामुळे कोणत्या प्रभागात किती निधी मंजूर झाला, कोणत्या कामासाठी किती खर्च झाला आणि किती निधी शिल्लक आहे, याची माहिती नागरिकांना मिळू शकेल. तसेच निधीचा विनियोग अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल, असे पत्रात म्हटले आहे.
कामांची तपासणी आणि फोटो काढण्याच्या आदेशांचे स्वागत
महापालिका आयुक्तांनी प्रत्येक कामाची तपासणी करण्याबाबत आणि कामांचे फोटो घेण्याबाबत दिलेल्या आदेशांचे पत्रात स्वागत करण्यात आले आहे.
या आदेशांची कडक अंमलबजावणी झाल्यास कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवता येईल आणि संभाव्य गैरप्रकारांना आळा बसू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बजेट वर्गीकरणापूर्वी कायदेशीर तपासणी करा
काहीजण बजेट विकत असल्याच्या चर्चा कानावर आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे बजेटचे वर्गीकरण किंवा विनियोजन मंजूर करण्यापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (MMC Act) मधील तरतुदींचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या जमा उत्पन्नाच्या मर्यादेतच विनियोजन करता येते का, तसेच प्रस्तावित ठराव कायदेशीर आहेत का, याची तपासणी करावी. कोणताही ठराव मंजूर करण्यापूर्वी त्याची कायदेशीर वैधता तपासण्याची जबाबदारी कार्यकारी अधिकारी म्हणून आयुक्तांनी पार पाडावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘पुणेकरांच्या कराच्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा’
पुणेकर नागरिकांच्या करातून महापालिकेला मिळणाऱ्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणे आवश्यक आहे. प्रभागनिहाय कामांचे नियोजन, निविदा प्रक्रिया आणि बजेटचा विनियोग यामध्ये पारदर्शकता असावी, अशी भूमिका पत्रात मांडण्यात आली आहे.
या मागण्यांवर आयुक्त नवल किशोर राम यांनी ठाम भूमिका घ्यावी आणि निविदा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS