Pune Ganesh Immersion | यंदाही दरवर्षीच्या क्रमाने होणार विसर्जन मिरवणूक – मिरवणुकीबाबत सर्व मंडळाचे एकमत
Muralidhar Mohol – (The Karbhari News Service) – पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा निर्माण झालेला वाद केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मिटवला असून यंदाही परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्व मंडळांकडून एकमताने घेण्यात आला आहे. मोहोळ यांनी यासंदर्भात मानाच्या मंडळांसह सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत यावर तोडगा काढला. या बैठकीनंतर मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता सुरू करून परंपरेनुसार मंडळाचे क्रम असतील हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Ganeshotsav 2025)
यंदाच्या वर्षी काही मंडळांनी नियोजित वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर मंडळांनी त्यावर विविध मते व्यक्त केली होती. त्यामुळे नवाच वाद निर्माण झाला होता. त्यावर खासदार मोहोळ आणि आमदार रासणे यांनी सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत या विषयावर तोडगा काढला आहे.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची चर्चा जगभरात होत असते. देशभरातून हा उत्सव पहायला भाविक मोठ्या संख्येने येत असताना अशावेळी नवे विषय समोर येणे हे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हिताचे नव्हते. याबाबत सर्व मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत सामोपचाराने आणि एकमताने निर्णय घेण्यास यश आले आहे.
‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा एक परिवार असून प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. मात्र हा विषय चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, यावर माझा विश्वास होता. म्हणूनच सर्वांना एकत्रित येत हा विषय मार्गी लावला आहे. मी हा निर्णय घेण्यासासाठी समजूतीची भूमिका घेणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.
बैठकीत झालेले निर्णय…
– मिरवणूक परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाणेच होणार
– मिरवणुकीचा शुभारंभ साडेनऊला करण्यात येणार
– स्थिर वादन कोणतेही मंडळ करणार नाही
– मिरवणूक वेळेत संपविण्याची जबाबदारी सर्वच मंडळांवर
– दोन मंडळातील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न

COMMENTS