Prithviraj Chavan Congress | निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून जमा पैशाचा पश्चिम महाराष्ट्रात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर | पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
भाजपाने पैशाचा कितीही वापर केला तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच बहुमत मिळणार
Prithviraj Chavan Congress – (The Karbhari News Service) – निवडणूक रोखे, इन्कम टैक्स तसेच इतर सरकारी संस्थांमार्फत विविध कंपन्यांकडून गोळा केलेल्या पैशाचा पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर भाजपाकडून केला जात आहे. भाजपाकडे पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने आधी सरकार पाडणे व आमदार विकत घेण्यासोबतच आता मते विकत घेण्यासाठी देखील पैशाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मात्र भाजपाने पैशाचा कितीही वापर केला, कितीही पैसे वाटले तरी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीलाच महाराष्ट्रात बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता पृथ्वीराज चव्हाण कॉंगेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पुणे शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, नागपुर पदवीधर क्षेत्राचे आमदार अभिजीत वंजारी, चंद्रपूरचे जिला कॉंग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी, प्रसार माध्यम समन्वयक राज अंबिके, डॅनियल लांडगे, महाराष्ट्र प्रदेश एन एस यू आय अध्यक्ष अमीर शेख, कामगार नेते सुनिल शिंदे, माजी नगरसेविका अश्विनी लांडगे व अन्य उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले कि संपूर्ण देशात मोदी विरोधी लाट आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय होणार आहे. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रचार यंत्रणेत काही त्रुटी होत्या, मात्र महाराष्ट्राचे कॉंगे्रस प्रभारी रमेश चेल्लीथाला यांनी बैठक घेऊन योग्य सूचना देऊन त्रुटी दूर करण्यात आल्या. निवडणुकीच्या सुरूवातीला भाजपाने ३७० पार ची घोषणा दिली. या घोषणेचा अर्थ देशाची घटना बदलण्यासाठी २/३ बहुमत संसदेत आवश्यक आहे, त्यासाठी ३७० जागा हव्या होत्या. सत्य पुढे आल्यानंतर ही घोषणा बदलून ४०० पार की घोषणा केली, जी नंतर हवेतच राहून गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत वर्ष २०१९ ला महाराष्ट्रात ६ सभा घेतल्या होत्या, मात्र यावेळी त्यांच्या आतापर्यंत १२ सभा झाल्या आहेत. महाराष्ट्राची निवडणुक अत्यंत महत्वाची असल्याने मोदींनी पहिल्यांदा प्रोटोकॉल तोडून दोन रात्री महाराष्ट्रात घालविल्या. नरेंद्र मोदी यांनी १० वर्ष कामकाज केल्यानंतरही त्यांच्याकडे मुद्दे नसल्यानेच त्यांना राहुल गांधी व कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याची वेळ आली आहे. तसेच कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यात जे लिहिलेले नाही, ते मुद्दे भाजपा पुढे आणत आहे. मोदींच्या सभांना गर्दी नाही, त्यांना प्रतिसाद देखील मिळत नाही. पैसे देऊन माणसे बोलवण्याची वेळ येत आहे. आता तर मोदींची सभा नको असे सांगितले जात आहे.
निवडणूक रोखे माध्यमाने सर्वांत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याकरिता मोदी सरकार ने कंपनी कायद्यामध्ये देखील बदल केलेला आहे. हा बदल रद्द करणे आवश्यक आहे. पूर्वी राजकीय पक्षांना देणगी देण्याकरिता संबंधित कंपनी मागील ३ वर्षांच्या नफ्याच्या ७.५ टक्के रक्कम देणगी स्वरूपात देऊ शकत होती. मात्र हा बदल रद्द करणे आवश्यक आहे, कारण ही अट रद्द केल्याने ज्या कंपन्या फायद्यात नाहीत, त्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळेच भाजपाला जेवढे पैसे मिळाले आहेत ते निवडणुक आयोगाकडे जमा केले जावेत. विरोधी पक्षांवर दबाव आणून निवडणुक जिंकण्यासाठी भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली, तसेच कॉंगेस पक्षाची विविध बँकांची खाती देखील सील करण्यात आली. भाजपाला निवडणुक जड जात असल्यानेच भाजपा मुद्यांवरून भरकटली आहे. त्याच्या विरूद्ध महाविकास आघाडी व इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
—-
शरद पवारांवरील टीका चुकीची
नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेमध्ये वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरची टिका केली. पंतप्रधान पदावरील व्यक्तिने अशा प्रकारची टिका करणे अत्यंत चुकीचे आहे. हिंदू संस्कृतीमध्ये असे बोलले जात नाही. मात्र यामुळे नागरिकांमध्ये भाजपा बद्दल अत्यंत चुकीचा संदेश गेला आहे. मतदार नाराज झाले आहेत, त्याचा परिणाम असा झाला आहे कि बारामतीमध्ये अजीत पवार यांना बॅनरवरून नरेंद्र मोदींचे फोटो काढावे लागले आहेत.
—
निवडणूक हिंदू विरूद्ध मुस्लिम नेण्याचा प्रयत्न
चव्हाण म्हणाले कि भाजपाला या निवडणुकीत योग्य प्रतिसाद मिळत नाही, तसेच त्यांच्याकडे काहीही मुद्दे नसल्याने ही निवडणुक हिंदू विरूद्ध मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने ध्रृवीकरण झाल्यास काही मते वाढतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र महाराष्ट्रात त्यांचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. या मातीत फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आहेत. त्यांचे रक्षण करण्याकरिता आम्ही सदैव तयार आहोत.
——————————
महाराष्ट्रातील सत्तांतर मोदींच्याच आशिर्वादाने
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादानेच झाले. त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमानेच सगळी सूत्रे हलविली गेली. त्यामुळेच पहिल्यांदा सुरत व नंतर गुवाहाटी येथे आमदारांना ठेवण्यात आले. त्यामुळे सुरूवातीला त्यांनी कितीही सांगितले कि त्यामध्ये आमचा काही संबंध नाही, तरी खरे सूत्रधार तेच असल्याचे आता जनतेला ही कळाले आहे.