डबल डेकर बस सुरु करण्याची तयारी पूर्ण करा
| पुणे स्मार्ट सिटीच्या कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
पुणे|पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत (smart city pune) कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian minister chandrakant patil) यांनी आढावा घेतला. सर्व कामे कालमर्यादेत व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहरात दुमजली (डबल डेकर) बसेस सुरू करण्यासाठी लवकरात लवकर तयारी पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, महानगपालिकेच्या सहआयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर उपस्थित होत्या.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शहरातील झाडांची उंची लक्षात घेऊन डबल डेकर बस सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु करावी. पायाभूत सुविधा विकास कामे दर्जेदार होतील यावर विशेष लक्ष द्यावे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओइपी) होणारे परीक्षण (ऑडीट) योग्यरितीने होत असल्याची खात्री करुन अद्याप अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. सकाळच्या वेळेत उद्यानांमध्ये फिरायला येणाऱ्यांना प्रसन्न वाटावे यासाठी त्याठिकाणी मंद आवाजात संगीत लावावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कडून राबण्यात येत असलेले संकल्पनाधिष्ठीत अर्थात थीम बेस्ड उपक्रम, ज्येष्ठ नागरिक पार्क, सायन्स पार्क, ऑगमेंटेड रियालिटी पार्क, शहरातील झाडांची देखभाल, वायफाय सुविधा, ईमर्जन्सी कॉलबॉक्स, स्मार्ट ई-बस, स्ट्रीट लाईट, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेची (अडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) कामे आदींच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच कामांसाठी आवश्क भूसंपादनविषयक बाबी, महामंडळाच्या आर्थिक बाबींविषयक विचारविनिमयदेखील यावेळी करण्यात आला.