Prajit Nair IAS | वारसा हक्काने शैक्षणिक पात्रतेनुसार पुणे महापालिकेत पहिल्यांदाच देण्यात आल्या नियुक्त्या | अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची प्रमुख भूमिका
| अर्ज केलेल्या ७५ कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत सेवानिवृत्त, दिवंगत किंवा वैद्यकीय कारणाने सेवेतून कमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना लाड/पागे समितीच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर शैक्षणिक पात्रतेनुसार पहिल्यांदाच नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. एकूण ३६ कर्मचाऱ्यांच्या कनिष्ठ अभियंता पदावर नेमणूका करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या देण्याच्या प्रक्रियेत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्याच पुढाकाराने ही प्रक्रिया तडीस नेण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. (PMC Employees)
लाड पागे समितीच्या शिफारशी नुसार शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देण्याबाबत राज्य सरकारने २००३ सालीच आदेश दिले होते. मात्र यावर पुणे महापालिकेत कुठलीही अमलबजावणी झाली नव्हती. त्यांनतर हे आदेश २०१६ सालीरद्दच करण्यात आले. त्यामुळे नियुक्ती देण्याचा प्रश्नच आला नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणी नुसार राज्य सरकारने पुन्हा २०२३ साली याबाबत आदेश जारी करत शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्त्या देण्यास सांगितले. मात्र तरीही पुणे महापालिकेत या विषयाला गंभीरपणे घेण्यात आले नाही.
दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आणि पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवले.
पुणे महापालिकेतील सफाई कामगारांसह इतर विभागातील सेवकांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाच्या सुधारित तरतुदींनुसार ही प्रक्रिया राबवली गेली.
शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या वारसांना गट-क व गट-ड म्हणजेच वर्ग-3 व वर्ग-4 च्या पदांवर नियुक्ती देताना शैक्षणिक अर्हता वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात आली आहे.
इतर विभागातील सेवकांच्या पात्र वारसांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कनिष्ठ अभियंता, संगणक ऑपरेटर/प्रोग्रामर आणि आरेखक या पदांसाठी अर्ज सादर केले होते. त्यानुसार कार्यालयीन परिपत्रकाद्वारे प्रथम प्रसिद्ध यादी जाहीर करून नंतर फेरप्रसिद्ध यादीद्वारे अर्ज मागवण्यात आले होते.
त्यानुसार एकूण 75 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या 75 अर्जांमध्ये पएम- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 48 अर्ज
– कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 12 अर्ज
– कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 4 अर्ज
– संगणक प्रोग्रामर/ऑपरेटर – 9 अर्ज
– आरेखक – 1 अर्ज
– आरेखक (वास्तुशिल्प) – 1 अर्ज असे अर्ज आले होते.
महापालिकेतील रिक्त पदे आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ नियुक्त्या देखील देण्यात आल्या. एकूण ३६ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता पदावर नेमणूक देण्यात आली आहे.
यामधे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३०, कनिष्ठ अभियंता (विद्युत) ४ आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) २ अशा नेमणुका देण्यात आल्या. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी या बाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. आगामी काळात देखील रिक्त पदानुसार नेमणूका दिल्या जाणार आहेत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS