Nitin Gadkari on Pune Traffic | ‘तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार’ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Homeadministrative

Nitin Gadkari on Pune Traffic | ‘तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार’ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ganesh Kumar Mule Jul 18, 2026 8:52 PM

Pune Pustak Mahotsav | पुणे पुस्तक महोत्सवात दुसरा विश्वविक्रम झाला| एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ यावर विश्वविक्रम
Mahalunge TP Scheme | म्हाळुंगे टीपी स्कीम ला मान्यता घेऊन विकास कामांना गती द्यावी  | अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 
Pune News | रस्त्यावरील भाजी विक्रेत्याचे पूरग्रस्तांसाठी ‘लाख’मोलाचे दान!

Nitin Gadkari on Pune Traffic | ‘तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार’ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

| पुणे – शिरुर, तळेगाव – चाकण – शिक्रापूर व हडपसर – यवत या ३ उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

 

Pune News – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यातील पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर-यवत उन्नत महामार्ग तसेच तळेगांव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग या कामाचे भूमिपूजन झाले. तब्बल 138 किमी लांबीच्या या महामार्गाची निर्मिती महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. (Pune Breaking News)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे होते. यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, परिवहन व सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, पुणे जिल्हापरिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे तसेच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, तसेच विविध शासकीय विभागांमधील अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी संबंधित तिन्ही प्रकल्पांची उपस्थितांना माहिती दिली. पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती महामार्गाच्या निमित्ताने देशातील पहिला संपूर्ण उन्नत सहपदरी मार्ग उभारण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पातील विकसित भारताची निर्मिती आपल्याला करायची आहे. त्यासाठीचे काम महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे सुरू आहेत. सदर तिन्ही प्रकल्पांचे काम दर्जेदार होईल, याची खात्री आपला विभाग घेईल, असे त्यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुण्याचा वाढता विस्तार आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला नवी गती मिळेल आणि हे मार्ग खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पुण्यातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत असून, पारंपरिक पद्धतीने रस्ते रुंद करणे शक्य नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एकाच खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी त्रिस्तरीय ‘सिंगल पिअर’ रचना उभारण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापरही आवश्यकतेनुसार करण्यात येत आहे. मलेशियन तंत्रज्ञानामुळे दोन खांबांमधील अंतर 120 मीटरपर्यंत ठेवता येणार असून, त्यामुळे खांबांची संख्या कमी होऊन खर्च आणि बांधकामाचा कालावधीही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्य सरकारने या प्रकल्पांसाठी राज्य जीएसटी आणि रॉयल्टीत दिलेल्या सवलतीबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच पुण्यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी पुरंदर परिसरात ‘नवीन पुणे’ विकसित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुणे हे महाराष्ट्राचे तसेच देशाचे ग्रोथ हब (विकास केंद्र) असून भविष्यातील पुण्याच्या वाहतुकीची गरज ओळखूनच तिन्ही प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधा विकासात मैलाचा दगड ठरतील. सदर प्रकल्पांमध्ये नाविन्यपूर्ण बीओटी (BOT) मॉडेल राबविले जात असून, यामुळे सरकारला 950 कोटी रुपयांचा प्रीमियम मिळणार आहे. भविष्यातील मेट्रो लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या त्रिस्तरीय रचनेमुळे मेट्रोच्या पायाभूत सुविधांवरील खर्चात सुमारे 40 टक्के बचत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन वेगाने सुरू असून, ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवंगत नेते अजित पवार यांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यांच्या दूरगामी संकल्पनेतून या महामार्गांचे नियोजन सुरू झाले होते, आज त्याची सुरूवात होत आहे, असे ते म्हणाले. या कामासाठी चार वर्षांची मुदत देण्यात आलेली असली तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी ते उपलब्ध करून देण्यात यावे, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना केली.

रिंगरोड, महामार्ग यांच्या माध्यमातून पुण्याच्या चारही बाजूंना आता वेगवान वाहतूकीचे पर्याय निर्माण होत असून त्यामुळे मुख्य शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच इतर ठिकाणी व्यवसाय उद्योग वाढीसाठी वाव मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

पुणे- शिरुर उन्नत मार्ग प्रकल्प (NH-753F)

* भारत सरकार (MORTH) आणि महाराष्ट्र शासन (GoM) यांच्यात अस्तित्वात असलेल्या पुणे – अहमदनगर – छत्रपतीसंभाजी नगर (औरंगाबाद) कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग-753 एफ (साखळी 10/600 ते साखळी 224/600) च्या विकासासाठीआणि पुणे ते छत्रपती संभाजी नगर पर्यंत नवीन ग्रीनफिल्ड ६-पदरी द्रुतगती मार्गाच्या बांधकाम व कार्यान्वित करण्यासाठी 08.03.2024 रोजी नागपूर येथे सामंजस्य करार (MOU) स्वाक्षरित करण्यात आला आहे

* पुणे ते शिरुर महामार्ग प्रकल्पाची लांबी 53.4 किमी आहे.

* या प्रकल्पामध्ये एकूण 35 कि.मी. (31 किमी लांबीचा उन्नतमार्ग खराडी जकात नाका ते कोंढापुरी, 2 किमी लांबीचा उड्डाणपूल रांजणगाव, 2 किमी लांबीचा उड्डाळ पुल कारेगाव येथेएकुण लांबी 35 किमी) लांबीचा 6 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावितअसून, उन्नत मार्गाखाली संपूर्ण लांबीमध्ये 4 पदरी जमिनीससमांतर महामार्ग प्रस्तावित आहे. तसेच कोंढापुरी ते शिरुरभागामध्ये 6 पदरी जमिनीस समांतर महामार्ग प्रस्तावित आहे.

* उन्नत मार्गाच्या द्वितीय स्तरावर (Second Tier) 7 कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे.

* प्रशासकीय मान्यता रक्कम 7515 कोटी आहे व प्रकल्पाची स्थापत्य कामाची रक्कम 4104 कोटी आहे.

* या प्रकल्पामधुन निविदाकाराद्वारे शासनास 500 कोटी Upfront Premium मिळणार आहे. तसेच हा प्रकल्प DFBOT ( Design Finance Build Operate Transfer ) या तत्वावर 29 वर्षांच्या निश्चित सवलत कालावधी वर आधारित आहे.

* सद्यस्थितीत शासनाद्वारे निविदा प्रस्तावास दि. 04.12.2025 रोजी मान्यता देण्यात आली आहे.

* केंद्र शासन, राज्य शासन व महामंडळ या तिघांमधील करारनामा निश्चित करून त्यावर स्वाक्षरी झाली आहे.

* सदर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन यशस्वी निविदाकारास दि.29.04.2026 रोजी Letter of Award प्रदान करण्यात आलेला असून प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

* सदर प्रकल्प 4 वर्षांमध्ये पुर्ण करण्याचे नियोजित आहे.

तळेगाव चाकण शिक्रापूर (NH-548D)

* दि. 08.03.2024 रोजी भारत सरकार व महाराष्ट्र शासनयांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) अनुषंगाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दि. 05.12.2024 रोजीच्या पत्रान्वये तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग प्रकल्प राज्य शासनाकडे हस्तांतरित केला.

* या प्रकल्पामध्ये एकूण 26.3 कि.मी. लांबीचा 4 पदरी उन्नतमार्ग असून, 53.2 कि.मी. लांबीचा 4 पदरी जमिनीस समांतरमहामार्ग प्रस्तावित आहे.

* तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग प्रकल्पाची लांबी 53.2 कि.मी आहे.

* प्रशासकीय मान्यता रक्कम 3923.89 कोटी आहे व प्रकल्पाची स्थापत्य कामाची रक्कम 2966 कोटी आहे.

* या प्रकल्पामधून निविदाकाराद्वारे शासनास 300 कोटी Upfront Premium मिळणार आहे.

* तसेच हा प्रकल्प DFBOT तत्त्वावर 29 वर्षांच्या निश्चित सवलत कालावधीवर आधारित आहे.

* केंद्र शासन, राज्य शासन व महामंडळ या तिघांमधील करारनामा निश्चित करून त्यावर स्वाक्षरी झाली आहे.

* निविदा स्वीकृतीसाठीचा प्रस्तावास मंत्रिमंडळ पायाभूत समितीद्वारे दि. 27.03.2026 रोजी मान्यता मिळाली आहे.

* सदर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन यशस्वी निविदाकारास दि. 16.06.2026 रोजी Letter of Award प्रदान करण्यात आलेला असून प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

* सदर प्रकल्प 4 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

हडपसर ते यवत मार्ग (NH-65)

* दि. 08.03.2024 रोजी भारत सरकार व महाराष्ट्र शासनयांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) अनुषंगाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दि. 05.12.2024रोजीच्या पत्रान्वये हडपसर–येवत महामार्ग प्रकल्प राज्यशासनाकडे हस्तांतरित केला.

* हडपसर यवत महामार्ग प्रकल्पाची लांबी 31.5 कि.मी आहे.

* या प्रकल्पामध्ये 25 कि.मी. लांबीचा 6 पदरी उन्नत मार्ग तसेच 31.5 कि.मी. लांबीचा जमिनीस समांतर 6 पदरी महामार्गप्रस्तावित आहे

* उन्नत मार्गाच्या द्वितीय स्तरावर (Second Tier) 9.75 कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे.

* प्रशासकीय मान्यता रक्कम 5262.36 कोटी आहे व प्रकल्पाची स्थापत्य कामाची रक्कम 3178.35 कोटी आहे

* या प्रकल्पामधून निविदाकाराद्वारे शासनास 150 कोटी Upfront Premium मिळणार आहे. तसेच हा प्रकल्प DFBOT तत्त्वावर 29 वर्षांच्या निश्चित सवलत कालावधीवर आधारित आहे.

* निविदा स्वीकृतीसाठीचा प्रस्तावास मंत्रिमंडळ पायाभूत समितीद्वारे दि. 27.03.2026 रोजी मान्यता मिळाली आहे.

* केंद्र शासन, राज्य शासन व महामंडळ या तिघांमधील करारनामा निश्चित करून त्यावर स्वाक्षरी झाली आहे.

* सदर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन यशस्वी निविदाकारास दि. 16.06.2026 रोजी Letter of Award प्रदान करण्यात आलेला असून प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

* सदर प्रकल्प 4 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: