PMC STP Project | पुण्यात दररोज ९८० एमएलडी सांडपाण्याची निर्मिती; केवळ ५९१ एमएलडीवर प्रक्रिया! | मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचा केंद्रीय मंत्र्यांकडून आढावा
| मार्च २०२७ पर्यंत २८५ एमएलडी अतिरिक्त प्रक्रिया क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट
| एसटीपींचा बांधकाम व देखभाल खर्च कमी करण्याचे सी. आर. पाटील यांचे निर्देश
Pune PMC News – The Karbhari News Service – पुणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे ९८० एमएलडी सांडपाण्यापैकी केवळ ५९१ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच शहरातील एकूण सांडपाणी निर्मितीच्या सुमारे ६० टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया होत आहे. उर्वरित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे महापालिकेकडून नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. मार्च २०२७ पर्यंत अतिरिक्त २८५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचा केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१९ नोव्हेंबर) केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (CWPRS), खडकवासला येथे आढावा घेण्यात आला. या बैठकीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची सद्यस्थिती, कामांची गुणवत्ता, बांधकाम आणि देखभाल खर्च तसेच प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी, महापौर मंजुश्री नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
| ५३५ एमएलडी क्षमतेचे नवीन प्रकल्प उभारणार
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बैठकीत पुणे शहरातील सांडपाणी निर्मिती आणि प्रक्रिया क्षमतेची माहिती सादर केली. सध्या महापालिकेकडे ५९१ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. उर्वरित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड, अमृत योजना, हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (HAM) आणि महापालिकेच्या स्वनिधीतून एकूण ५३५ एमएलडी क्षमतेचे नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी मार्च २०२७ पर्यंत अतिरिक्त २८५ एमएलडी प्रक्रिया क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
| ११ एसटीपींपैकी पाच प्रकल्प पूर्ण
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती दिली. मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांतर्गत एकूण ३९६ एमएलडी क्षमतेची ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे (एसटीपी) उभारण्यात येत आहेत. यापैकी १११ एमएलडी क्षमतेच्या पाच केंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. बॉटनिकल गार्डन एसटीपी वगळता इतर एसटीपींची कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच भैरोबा एसटीपी येथे गॅस इंजिनच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. सांडपाणी वाहिन्यांची कामे ऑक्टोबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
| एसटीपीचा बांधकाम आणि देखभाल खर्च कमी करा
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी एसटीपी प्रकल्पांच्या बांधकामासाठी येणारा खर्च आणि देखभाल व दुरुस्तीवरील खर्चाचा आढावा घेतला. नमामि गंगे प्रकल्पाचा संदर्भ देत सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीचा खर्च अधिक किफायतशीर ठेवावा, तसेच देखभाल आणि दुरुस्तीवरील खर्च कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
एसटीपी प्रकल्पांच्या निविदा आणि करारामध्ये सात वर्षांच्या कालावधीत आवश्यकतेनुसार यांत्रिक यंत्रसामग्री व उपकरणे बदलणे आणि अद्ययावत करण्याची तरतूद असावी, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रकल्पांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी आणि निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यासाठी निविदांमध्ये प्रोत्साहनपर तरतुदींचा समावेश करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
| प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी वडगाव येथील २६ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी केली. प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या पाण्याचा उद्याने, बांधकामे, हरित क्षेत्रे आणि इतर बिगर-पिण्याच्या वापरासाठी पुनर्वापर करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
यामुळे पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अधिकाधिक वापर शक्य होणार आहे.
| नदी प्रदूषण नियंत्रणासाठी लोकसहभागावरही भर
बैठकीत एसटीपी प्रकल्पांची सद्यस्थिती, सांडपाणी वाहिन्यांचे जाळे, तांत्रिक अडचणी, SCADA प्रणालीद्वारे देखरेख, GIS मॅपिंग आणि जनजागृती उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. नदी स्वच्छतेसाठी महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या नदी महोत्सव आणि विविध जनजागृती उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी होऊन नदी पुनरुज्जीवनाला मदत होईल, असे सांगितले. महापौर मंजुश्री नागपुरे यांनीही नदीचे प्रदूषण रोखणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे याला महापालिकेचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
एकूणच, सांडपाणी प्रक्रिया क्षमता वाढवणे, एसटीपींची कामे वेळेत पूर्ण करणे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे या माध्यमातून मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रणाला गती देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

COMMENTS