PMC JE Bharti | कनिष्ठ अभियंता भरती : पेपर फुटीचा आरोप पुणे महापालिकेने फेटाळला | १६९ पैकी १४६ पात्र उमेदवारांना दिली नियुक्तीपत्रे! 

Homeadministrative

PMC JE Bharti | कनिष्ठ अभियंता भरती : पेपर फुटीचा आरोप पुणे महापालिकेने फेटाळला | १६९ पैकी १४६ पात्र उमेदवारांना दिली नियुक्तीपत्रे! 

Ganesh Kumar Mule Aug 28, 2026 8:23 PM

PMC JE Recruitment 2025 | पुणे महापालिकेत अभियंता होण्याची संधी | उद्यापासून अर्ज करा | १६९ पदांसाठी जाहिरात आली 
PMC JE Recruitment | 2023 साली नियुक्त केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या कागदपत्रांची पुन्हा होणार तपासणी!
PMC JE Recruitment 2025 | पुणे महापालिका  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती | आतापर्यंत ३३०० उमेदवारांनी केले अर्ज 

PMC JE Bharti | कनिष्ठ अभियंता भरती : पेपर फुटीचा आरोप पुणे महापालिकेने फेटाळला | १६९ पैकी १४६ पात्र उमेदवारांना दिली नियुक्तीपत्रे!

 

PMC Bharti – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ च्या १६९ पदांच्या भरती प्रक्रियेत पेपरफुटी झाल्याचा सोशल मीडियावर करण्यात आलेला आरोप महापालिकेने सपशेल फेटाळून लावला आहे. हा प्रकार केवळ तीन उमेदवारांपुरता मर्यादित व वैयक्तिक स्वरूपाचा गैरप्रकार होता, प्रश्नपत्रिका फुटल्याचा कोणताही पुरावा नाही, असा निर्वाळा IBPS आणि TCS ने दिला असून महापालिकेने आज १४६ पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटप केली आहेत. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली. (Prajit Nair IAS)

काय आहे प्रकरण?

परीक्षा पूर्व नियोजनानुसार दि.०१/१२/२०२५ व दि.२५/०१/२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु नगरपरिषद निवडणुका, परीक्षा केंद्रांमधील पारदर्शकता आणि केंद्रांचे दूरवर असलेले अंतर याबाबत उमेदवारांकडून आलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन महापालिका आयुक्तांच्या ठरावान्वये ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मे. IBPS या संस्थेमार्फत छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, नागपूर, पुणे आणि मुंबई या सात प्रमुख शहरांतील ‘TCS-ion’ केंद्रांवर दि. २२, २३ व २९ एप्रिल २०२६ रोजी एकूण ०३ दिवसांत ०७ सत्रांमध्ये पूर्ण पारदर्शकतेने ही परीक्षा पार पडली.

परीक्षेचा एकूण गुणांसह निकाल दि. ०९/०६/२०२६ रोजी व विषयनिहाय निकाल दि. १५/०६/२०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर दि. १९/०६/२०२६ रोजी नियमानुसार १:३ या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची/ प्रमाणपत्रांची तपासणी दि. २४, २५, २९ व ३० जून २०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना G.B. Hall), मुख्य इमारत, मनपा भवन, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १०:०० वाजल्यापासून आयोजित केली होती. तसेच गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना दि. ०१/०७/२०२६ व दि. ०२/०७/२०२६ रोजी कागदपत्रे/प्रमाणपत्रे तपासणीसाठी अंतिम संधी देण्यात आली होती. त्यानुसार कागदपत्र पडताळणी अंती आकडेवारी खालीलप्रमाणे:

– पडताळणीसाठी बोलविलेले उमेदवार: ५४५
– उपस्थित राहिलेले उमेदवार: ५१०
– अनुपस्थित / अपात्र उमेदवार: ५२
– पात्र ठरलेले उमेदवार: ४९३
– निवड यादी: १४६
– प्रतीक्षा यादी: ३४०
– Subject to verification: ७

कागदपत्र पडताळणीच्या अंती प्राप्त अहवालानुसार कर्मचारी निवड समितीने  याद्यांना एकमताने मंजुरी दिली आहे:
दरम्यान, १९ जून २०२५ रोजी कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर X (ट्विटर) वर परीक्षेतील एका प्रश्नाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आणि पेपरफुटीचा आरोप झाला.

IBPS आणि TCS च्या चौकशीत काय आढळले?

महापालिकेने तात्काळ हा स्क्रीनशॉट IBPS कडे पाठवला. IBPS ने केलेल्या सखोल तपासणीत महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले –

*१. पेपरफुटी नाहीच:* ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक उमेदवाराला १०० प्रश्न असतात, पण प्रत्येकाचा प्रश्नांचा क्रम आणि चारही पर्यायांचा क्रम वेगळा असतो. त्यामुळे कोणत्याही दोन उमेदवारांची प्रश्नपत्रिका एकसारखी नसते. व्हायरल झालेला फोटो २३ एप्रिलच्या सत्र-१ मधील एका विशिष्ट उमेदवाराच्या लॉग-इन मधील असल्याचे सिद्ध झाले.

*२. ३ उमेदवारांचा गैरप्रकार:* सर्व ५५७ उमेदवारांच्या डेटा लॉगची तपासणी करण्यात आली. कोणता प्रश्न कधी पाहिला, कधी उत्तर दिले, कधी जतन केले याची मिनिटा-मिनिटाला नोंद असते. त्यात ३ उमेदवार संशयित आढळले. या तिघांनी परीक्षेच्या सुरुवातीला जवळपास सर्व प्रश्न फक्त पाहून ठेवले, एकही उत्तर दिले नाही आणि शेवटच्या १५-२० मिनिटांत झपाट्याने उत्तरे भरली. तिघांची उत्तरे देण्याची पद्धत आणि चुका जवळपास सारख्याच होत्या. सीसीटीव्ही फुटेजनेही याला दुजोरा दिला.

महापालिकेने स्पष्ट केले की, हा प्रकार म्हणजे परीक्षा कक्षात वैध मार्गाने नसलेल्या साधनाद्वारे बाहेरून मदत घेऊन केलेला गैरप्रकार आहे, पेपरफुटी नाही.

३ उमेदवार रद्द, २ कर्मचाऱ्यांवर FIR

या प्रकरणी तिन्ही उमेदवारांना अपात्र ठरवून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यांना मदत करणारे परीक्षा केंद्र पुरवठा दाराचे दोन कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे – एक विद्युत विभागातील तर दुसरा पायाभूत सुविधा विभागातील. दोघांनाही सेवेतून काढून टाकण्यात आले असून भविष्यातील सर्व परीक्षांसाठी त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.

या तिन्ही उमेदवार आणि दोन्ही कर्मचारी यांच्याविरुद्ध पोलिसांत FIR दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महापालिका, IBPS किंवा TCS च्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग आढळलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच या निकालाचे स्वतंत्र ऑडिट TCS आणि आंतरराष्ट्रीय ऑडिट कंपनी M/s Ernst & Young यांनी केले आहे.

१४६ जणांना नियुक्ती, उर्वरित प्रक्रिया सुरू

१६९ पदांपैकी १४६ पात्र उमेदवारांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

१६९ पदांपैकी १४६ उमेदवारांसाठी आज नियुक्ती आदेश अधिकृतपणे निर्गमित करण्यात येत आहेत. सदर १६९ पदांपैकी माजी सैनिक आरक्षण १७ पदे, संस्थात्मक अनाथ आरक्षण ०१ पद याकरिता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे एकूण १८ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. पैकी संस्थात्मक अनाथ आरक्षण ०१ या पदाकरिता कागदपत्रे पडताळणी करिता पात्र उमेदवारांना आमंत्रित करणेत येऊन त्यानुसार पुढील कार्यवाही करणेत येईल. तसेच खेळाडू आरक्षण ०१ पद खेळाडू प्रमाणपत्र, गैरप्रकार केलेल्या ०२ उमेदवारांचा व अनुसूचित जमाती (ST) आरक्षण ०२ पदे जात वैधता प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणी दरम्यान सादर न केल्यामुळे ५ उमेदवारांचे नियुक्ती आदेश सध्यातरी राखून ठेवण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांनी आवश्यक ती वैध प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडून पडताळून सादर केल्यानंतर त्यांच्या नियुक्तीबाबत पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. आज निर्गमित केलेले नियुक्ती आदेश प्राप्त झालेनंतर १४६ पात्र उमेदवारांना विहित सेवा प्रवेश नियमानुसार प्रत्यक्ष पदावर रुजू करून घेतले जाणार आहे

संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक असून IBPS चा सविस्तर अहवाल महापालिकेने https://www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जसाच्या तसा प्रसिद्ध केला आहे. नागरिकांना केवळ प्रशासनाने दिलेला सारांश नव्हे, तर प्रत्यक्ष पुरावे स्वतः तपासण्याचा अधिकार आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.

 “ही प्रकरणे तार्किक शेवटापर्यंत नेण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. परीक्षा दिलेल्या प्रत्येक उमेदवाराशी न्याय्य ठरेल अशीच भरती प्रक्रिया राबविण्याचा आमचा निर्धार कायम आहे,” असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

पुढील सर्व परीक्षांसाठी परीक्षा केंद्रावरील मनुष्यबळ मर्यादित ठेवणे, संबंधित केंद्रावरील पुरवठादाराचे मनुष्यबळ बदलणे आणि बायो-ब्रेक पद्धती अधिक कडक करणे असे निर्णय घेण्यात आले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: