`Youth Congress: ५० लाख रिक्त सरकारी पदे वर्षभरात भरा, ‘मेरी डिग्री का क्या?’ अभियान सुरू`
Pune News – (The Karbhari News Service) – शभरातील विविध सरकारी विभागांमध्ये ५० लाख ५ हजार ८५० मंजूर पदे रिक्त असल्याचा दावा करीत ही सर्व पदे एका वर्षाच्या आत भरण्यासाठी केंद्र सरकारने कालबद्ध भरती कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. यासाठी ‘मेरी डिग्री का क्या?’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येणार असून, महाराष्ट्रातील अभियानाची भूमिका पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
इंडियन यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी इंदूर येथे या अभियानाची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. अभियानाची वेबसाइट आणि पुढील वर्षभराचा कृती आराखडाही तेथे जाहीर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील अभियान आणि पुढील कार्यक्रमांची माहिती पुण्यात देण्यात आली.
‘युवकांच्या मेहनतीला न्याय हवा’ — उदय भानू चिब
देशातील लाखो युवक पदवी आणि आवश्यक पात्रता मिळवूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचे चिब यांनी सांगितले. सामान्य कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक भार उचलतात. अशा परिस्थितीत सरकारी विभागांमध्ये लाखो मंजूर पदे रिक्त का ठेवली जात आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
“युवक केवळ नोकरी मागत नाही; तो आपल्या आई-वडिलांना आधार देण्याची आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्याची संधी मागत आहे. युवकांची मेहनत, त्यांचा वेळ आणि त्यांच्या भविष्याला किंमत आहे,” असे चिब म्हणाले.
एका वर्षात रिक्त पदे भरण्यासाठी ठोस कार्यवाही न झाल्यास देशभर ‘जॉब मार्च’ आणि ‘डिग्री मार्च’ आयोजित करून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
‘महाराष्ट्रातील युवकांचा आवाज बुलंद करणार’ — शिवराज मोरे
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “राज्यातील लाखो युवक स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्षे तयारी करीत आहेत. केंद्रासह राज्यातील विविध विभागांमध्ये किती मंजूर पदे रिक्त आहेत, किती भरती प्रक्रिया प्रलंबित आहेत आणि त्या कधी पूर्ण होणार, याची माहिती सरकारने सार्वजनिक करावी.”
‘मेरी डिग्री का क्या?’ अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत नेण्यात येणार आहे. महाविद्यालये, विद्यापीठे आणि स्पर्धा परीक्षार्थींशी संवाद साधून बेरोजगारी आणि प्रलंबित भरतीचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यात येतील, असे मोरे यांनी सांगितले.
‘परीक्षेपासून नियुक्तीपर्यंत निश्चित मुदत हवी’ — प्रथमेश आबनावे
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे म्हणाले, “सरकारी भरतीची केवळ जाहिरात काढून चालणार नाही. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी आणि अंतिम नियुक्तीपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा असली पाहिजे.”
स्पर्धा परीक्षांसाठी युवक आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे खर्च करतात. परीक्षा पुढे ढकलणे, निकाल रखडणे आणि नियुक्त्यांना होणारा विलंब यामुळे उमेदवारांचे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक विभागाने वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करावी, असे आबनावे यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या
• देशभरातील ५०,०५,८५० रिक्त मंजूर पदे एका वर्षात भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.
• केंद्र आणि राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती सार्वजनिक करावी.
• प्रत्येक सरकारी विभागाने वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे.
• जाहिरात, परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी ते अंतिम नियुक्तीपर्यंत स्पष्ट कालमर्यादा निश्चित करावी.
• प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात.
• परीक्षा आणि निवड प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व निश्चित करावे.
• रिक्त पदे, सुरू असलेल्या भरती आणि झालेल्या नियुक्त्यांचा नियमित सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करावा.
वर्षभर देशव्यापी अभियान
येत्या वर्षभरात देशभर जॉब मार्च, डिग्री मार्च, महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील संवाद आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. एका वर्षात रिक्त पदे भरण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसने दिला.
“पदवी आहे, पात्रता आहे आणि मेहनतीची तयारीही आहे; मग रोजगाराची संधी कुठे आहे? ‘मेरी डिग्री का क्या?’ या युवकांच्या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे,” अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस महेश म्हेत्रे तसेच प्रदेश सचिव विश्वजीत जाधव, प्रियांका चौधरी आणि अभिषेक अवचार उपस्थित होते.

COMMENTS