PMC JCB Tender Controversy | JCB भाड्यापोटी १.३१ कोटींची उधळपट्टी? काँग्रेसचा गंभीर आरोप

Chandu Kadam, Congress Leader PMC Pune

Homeadministrative

PMC JCB Tender Controversy | JCB भाड्यापोटी १.३१ कोटींची उधळपट्टी? काँग्रेसचा गंभीर आरोप

Ganesh Kumar Mule Sep 18, 2026 8:00 AM

PMC Recruitment | महापालिका भरती |१३५ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या नेमणुका | ६ महिने असणार प्रशिक्षण कालावधी
Pune Rain | पुण्यात सिंहगड रोड, कोथरूड मध्ये पावसाने नागरिकांची तारांबळ | महापालिका आयुक्त जातीने उपस्थित
Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune | पुणे महापालिकेकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार

PMC JCB Tender Controversy | JCB भाड्यापोटी १.३१ कोटींची उधळपट्टी? काँग्रेसचा गंभीर आरोप

 

Chandu Kadam Pune Congress – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या विविध रॅम्पवरील कामांसाठी जेसीबी (एक्स्कव्हेटर लोडर) मशीन भाडेतत्त्वावर घेण्याच्या निविदेला स्थायी समितीने १६ सप्टेंबर  रोजी मान्यता दिली असून, या निर्णयाला काँग्रेस पक्षाचे गटनेते व नगरसेवक अ‍ॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी तीव्र आक्षेप घेत  फेरविचार  सादर केला आहे. निविदेतील दर हा सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD/MJP) च्या दराच्या आणि प्रत्यक्ष बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत विसंगत असल्याचा तसेच यामुळे पुणेकरांच्या पैशांची उघड उधळपट्टी होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. (PMC Standing Committee)

काय आहे प्रकरण?

महापालिकेच्या विविध रॅम्पवरील कामांसाठी जेसीबी मशीन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेत मे. अभिजित एंटरप्रायझेस, पुणे यांच्याकडून तडजोडीने रुपये १,३१,३४,०००/- इतक्या रकमेचा प्रस्ताव प्रशासनाकडून ७ सप्टेंबर २०२६ रोजी मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचे अवलोकन केले असता, मशीन चालू करून नुसते जागेवर उभे असताना किंवा चालताना येणारा प्रत्यक्ष डिझेल व चालकाचा खर्च विचारात घेता, ठेकेदाराने भरलेला दर आणि प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक हे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (PWD/MJP) १,४०१ रुपये प्रति तास या दराच्या तुलनेत आणि प्रत्यक्ष बाजारभावाच्या विसंगत असल्याचे कदम यांनी निदर्शनास आणले आहे.

टेंडर दरातील विसंगती

विषयपत्र क्र. ११६३ नुसार ठेकेदाराने भरलेला टेंडर दर हा प्रति मशीन प्रति तास केवळ ८०० रुपये इतका येत असल्याचे कदम यांनी नमूद केले आहे. निविदेतील तासाचा दर इतका कमी आल्यास संबंधित प्रकरणी भ्रष्ट व अशक्य बाबींस मोठ्या प्रमाणावर विरोध होईल, याची पूर्वकल्पना असल्यानेच वेहिकल डेपो प्रशासनाने ही निविदा तासांऐवजी एकत्रित रकमेवर मागवली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. काम तासी पद्धतीने करावयाचे असल्यास निविदाही तासी पद्धतीनेच मागवणे क्रमप्राप्त होते; मात्र जाणीवपूर्वक मोटार वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही निविदा एकत्रित रकमेवर मागवून विशिष्ट ठेकेदारांना आर्थिक हितसंबंध मिळवून देण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

नवीन मशीन खरेदी करणे स्वस्त — कदम यांचा दावा

सध्याच्या कंपनी दरपत्रकानुसार (दिनांक १६/०९/२०२६) नवीन JCB 3DX मशीनची पुणे पोहोच किंमत अंदाजे ३० लाख रुपये प्रति मशीन इतकी आहे. त्यामुळे निविदा रकमेच्या (रु. १,३१,३४,०००/-) या निधीमध्ये महापालिका स्वतःच्या मालकीची जवळपास ४ नवीन JCB मशीन खरेदी करू शकली असती, असे कदम यांनी स्पष्ट केले आहे. मशीनच्या प्रत्यक्ष खरेदी किमतीपेक्षा जास्त भाडे एकाच वर्षाच्या किंवा अल्पमुदतीच्या कंत्राटासाठी ठेकेदाराला देणे ही पुणेकरांच्या पैशांची उघड उधळपट्टी व महापालिकेच्या आर्थिक हितसंबंधांना बाधक ठरणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तीन प्रमुख मागण्या

फेरविचार द्वारे कदम यांनी स्थायी समितीसमोर पुढील मागण्या मांडल्या आहेत :

१. निविदा प्रक्रियेतील तांत्रिक व आर्थिक बाबींतील विसंगती आणि सार्वजनिक निधीचा होणारा अपव्यय पाहता, मे. अभिजित एंटरप्रायझेस यांना देण्यात आलेला रु. १,३१,३४,०००/- किमतीचा प्रस्ताव फेरविचार करून तात्काळ रद्दबातल (Cancel) घोषित करण्यात यावा.

२. ज्या मशीनरीच्या भाडे रकमेपेक्षा मशीनरीची किंमत कमी असल्यास, पुणे महानगरपालिकेने स्वमालकीची मशिनरी विकत घ्यावी.

३. कंत्राटदाराला भरमसाठ भाडे देण्याऐवजी, निविदा रकमेच्या उपलब्ध निधीमधून पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या मालकीची ४ JCB 3DX मशीन खरेदी करावी, जेणेकरून मनपाचा स्थायी स्वरूपात खर्च वाचेल आणि कचरा रॅम्पवरील कामांवर मनपाचे प्रभावी नियंत्रण राहील.

आंदोलनाचा इशारा

या प्रकरणी आयुक्तांनी तातडीने गांभीर्यपूर्वक कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल आणि योग्य त्या न्याय संस्थेकडे दाद मागितली जाईल, असा स्पष्ट इशारा अ‍ॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी या पत्राद्वारे दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: