National Health Mission | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत विशेष तपासणी मोहीमेचा शुभारंभ व राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन

HomeBreaking News

National Health Mission | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत विशेष तपासणी मोहीमेचा शुभारंभ व राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन

Ganesh Kumar Mule Mar 01, 2025 2:44 PM

Mhada pune : पुणे म्हाडाच्या 4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ
Ajit Pawar on Pune Rain | शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश 
PDRF PMRDA | पीएमआरडीएच्या माध्यमातून पीडीआरएफची स्थापना!

National Health Mission | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत विशेष तपासणी मोहीमेचा शुभारंभ व राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन

प्रत्येक बालकांना सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचे काम करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Ajit Pawar – (The Karbhari News Service) – राज्य शासन प्रत्येक बालकांचे आरोग्य व उज्ज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेनी पार पाडेल; सर्वांनी मिळून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आयोजित विशेष तपासणी मोहीम यशस्वी करुया, व या माध्यमातून प्रत्येक बालकांना सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचे काम करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. (Maharashtra News)

औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष तपासणी मोहीमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (दूरदृष्यप्रणीलीद्वारे) तर व्यासपीठावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत ६ हजार शाळांमधील १४ लाख विद्यार्थी आणि ३० हजार अंगणवाडीतील २० लाख बालकांची डोक्यापासून ते नखा पर्यत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच यामाध्यमातून बालकांच्या आरोग्य विषयी माहिती मिळणार आहे. पहिल्याच टप्प्यात शारीरिक, मानसिक आजाराचे निदान होऊन त्यांच्यावर वेळेत मोफत उपचार करता येणार आहे, अशाप्रकारचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

ते पुढे म्हणाले, बालकांचे आरोग्य एखाद्या कुटुंबापुरते मर्यादित नसून ते समाज, देशाच्या उज्जवल भविष्याकरीता महत्वाचे असते. त्यामुळे राज्यातील बालके सदृढ असली पाहिजे, त्याचे आरोग्य चांगले असले पाहिजे, अभ्यासात प्राविण्य मिळवले पाहिजे, यापद्धतीने सुदृढ व जबाबदार नागरिक घडविण्याचे काम केले पाहिजे. बालकांना जन्मजात कुपोषण, ॲनेमिया, डोळे व दाताचे आजार, हद्यरोग, कुष्ठरोग आदीप्रकारचे आजार असतात त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते, या मोहिमेचा माध्यमातून अशा बालकांवर शासकीय रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टराद्वारे वेळेत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने गरजू बालकांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक सेवा देण्याकरीता पुढे येत असून त्यांच्या सेवेचा लाभ गरजू नागरिकांना लाभ मिळण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील आहे. राज्यात महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लस देण्याबाबत राज्य शासन विचार करीत असून त्याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य करण्यात येईल- मंत्री दादाजी भुसे

मंत्री श्री. भुसे म्हणाले, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत आयोजित विशेष तपासणी मोहीमेअंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचे काम करावयाचे आहे. गंभीर आजारावर उपचाराकरीता सुपर स्पेशिलिटी रुग्णालयातही विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्याचे काम करावे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या आजारावर वेळेत उपचार होण्याकरीता आगामी काळात एक कक्ष स्थापन करण्याबाबत नियोजन करावे. एकही विद्यार्थी उपचारापासून वंचित राहणार नाही, याबाबत शालेय शिक्षण विभागाने दक्षता घ्यावी. शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून ही मोहिम यशस्वी करण्याकरीता काम करावे, असे श्री. भुसे म्हणाले.

आगामी काळात आरोग्यसंपन्न पिढी निर्माण करण्याचे काम करुया- मंत्री प्रकाश आबिटकर

श्री. आबिटकर म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सर्व सामान्य नागरिकांकरीता विविध योजना राबवून त्यांना लाभ दिला जात आहे. या सर्वप्रकारच्या योजनांचे सुक्ष्म नियोजन करुन अपेक्षित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. राज्यातील सुमारे दोन कोटी महिलांची आरोग्यविषयक तपासणी करुन त्यांच्यावर आवश्यक त्या सर्व प्रकारचे उपचार करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या १०० दिवसाच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सुमारे दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण जिल्हा रुग्णालय उप जिल्हा रुग्णालयाचेही लोकार्पण करुन नागरिकांना अधिकाधिक आरोग्यविषयक सेवा देण्याचे काम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

‘निरोगी बालपण आणि सुरक्षित भविष्य “या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष तपासणी मोहिम आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालकांची आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार आहे. बालकांमधील आजाराचे वेळेत निदान करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून त्यांना आगामी काळात निरोगी व सुरक्षित आरोग्य जगता येणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच आरोग्य विभागाच्या पथकांनी मिळून काटेकोरपणे नियोजन करावे. अतिशय नीटनिटके, पारदर्शक आणि लोकांप्रती उपयुक्त अशाप्रकाची कामे करुन ही मोहिम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे, यामाध्यमातून आगामी काळात आरोग्यसंपन्न पिढी निर्माण करण्याचे काम करुया, असेही श्री. आबिटकर म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या जनजागृतीकरीता तयार करण्यात आलेले पोस्टर, बोधचिन्ह तसेच ॲनेमियामुक्त भारत मोहीम पोस्टर्स व फ्लिप बुकचे अनावरण करण्यात आले.

डॉ. अंबाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. कमलापूरकर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: