MLA Hemant Rasane | कचऱ्याची जागा घेत आहेत वारसा सांगणाऱ्या शिल्पकृती | आमदार हेमंत रासने यांचे ‘मिशन १०० दिवस’ सुरू
Kasba Constituency – (The Karbhari News Service) – ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियान’ आता स्वच्छतेकडून सुंदरतेकडे वळण घेत असून, आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून पेठांमधील कचरा साचणाऱ्या 56 ठिकाणांची जागा या परिसरातील इतिहास, संस्कृती आणि समाजजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या आणि कसब्याचा गौरवशाली वारसा सांगणाऱ्या शिल्पकृती घेत आहेत. (Pune News)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना समर्पित एक आकर्षक त्रिमितीय शिल्पकृतीचे लोकार्पण करून या योजनेचा आणि स्वच्छ कसब्याचा पुढचा टप्पा असणाऱ्या ‘मिशन १०० दिवस’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शनिवार पेठ येथे करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., दिग्दर्शक व अभिनेता प्रविण तरडे, महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलभाऊ रासने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघातील 56 क्रॉनिक कचरा स्पॉट्सपैकी 40 स्पॉट बंद करण्यात यश मिळाले आहे. उर्वरित स्पॉट नजीकच्या काळात बंद केले जातील. कचरा साठणाऱ्या या जागांवर प्रेरणादायी शिल्पकृती उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी (22 जुलै) 22 शिल्पकृतींची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.”
रासने पुढे म्हणाले, ” पवळे चौकात बारा बलुतेदारांचे, दूध भट्टी परिसरात पूर्वेकडील सामाजिक जीवनाचे, समता भूमी येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि लहुजी वस्ताद, नागनाथ पाराजवळ शाहू महाराज, थोरले बाजीराव आणि पेशव्यांचा इतिहास, मांगिरबाबा येथे अण्णा भाऊ साठे, चिंचेची तालीम येथे कुस्ती अशा काही शिल्पकृतींची निर्मिती निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघ स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार असून, देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी इतिहास, संस्कृती आणि समाज जीवनाचे दर्शन घडविणार आहे. ही ठिकाणे भावी पिढीलाही प्रेरणादायी ठरतील.”
रासने पुढे म्हणाले, ” स्वच्छ सुंदर विकसित कसबा या अभियानात मोठा लोकसहभाग लाभत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी नागरिक आणि महापालिका प्रशासनाचे मोठे सहकार्य मिळत आहे. सुंदर शिल्पकृतींच्या निर्मितीसाठी विविध उद्योगांनी सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) देण्याची तयारी दर्शविली आहे. ”
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, “कोणतेही काम साधनसामग्रीच्या आधारावर करता येते, पण मनपरिवर्तन ही त्यामागील खरी शक्ती असते. आमदार रासने यांनी निवडून येताच स्वच्छतेवर भर दिला, याचे आम्हाला समाधान आहे. पुणेकरांच्या सहभागातून आपण आपल्या शहराला देशात सर्वात स्वच्छ शहर बनवू शकतो.
तरडे म्हणाले, “मी दररोज दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनासाठी येतो, त्यामुळे माझा कसब्याशी अतूट संबंध आहे. या मतदारसंघाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, इथल्या आमदारांवर महत्त्वाची जबाबदारी असते. कसबा परिसरात विकास करण्यासाठी जागेची मर्यादा असली, तरी जे उपलब्ध आहे ते सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे. रासने यांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे.”
कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी येत्या गणेशोत्सवात सर्व मंडळांनी ‘स्वच्छता’ या विषयाबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले.
‘मिशन शंभर दिवस’
“राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसापासून (10 जून) ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत (17 सप्टेंबर) ‘मिशन १०० दिवस’ ही स्वच्छतेची विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत स्वच्छ कसब्यासाठी 272 बूथमध्ये ‘मेरा बूथ, सबसे सुंदर’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जनसहभाग, जनजागृती, कचऱ्याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, ई- कचरा संकलन असे निकष असणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागांच्या कोठ्या आणि गणेशोत्सव मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे.” असे रासने यांनी सांगितले.
COMMENTS