Marathi Bhasha Gaurav Din | अनंतराव पवार महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
Anantrao Pawar College – (The Karbhari News Service) – २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस होय. साहित्यक्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात मराठी भाषेच्या गौरवार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News)
मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते महाविद्यालयाच्या मुख्य आवारात मृदुंग-टाळांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मा. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. भरत कानगुडे यांनी केले. मराठी विभागप्रमुख डॉ. गणेश चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच मराठी विभागातर्फे मराठी भाषेच्या वाढीसंदर्भात वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच रोहिणी गोरे, सानिका म्हेत्रे, दिव्या बोरसे, गौरी शितोळे, वृणाली निर्मळ या विद्यार्थिनींनी मराठी भाषेविषयीचे आपले विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. बी. जी लोबो यांनी कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन केले. कुसुमाग्रज यांनी कवितेबरोबरच नाटक, कथा, कादंबरी, अनुवाद, समीक्षा इ. साहित्यप्रकारात लेखन केले. या साहित्यिकाच्या साहित्यातून आपण काय घेतो, शिकतो हे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. आणि एका साहित्यिकाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो यावरून त्यांचे मराठी भाषेतील स्थान लक्षात येते, हेही अधोरेखित केले. सध्याच्या वास्तवात आपण मराठी भाषेची हेळसांड करत आहोत. कारण आपली मुलं जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतील तर मराठी भाषेच्या दुर्दशेबाबत बोलण्याचा आपल्याला काय अधिकार उरतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मराठी भाषेविषयीचा आग्रह धरताना भाषाशुद्धीचा दुराग्रह मात्र करू नये, कारण त्यामुळे भाषा किचकट होऊन जाईल. मातृभाषा मराठीबरोबरच इतर बोलीभाषाही आपण जपल्या पाहिजेत, कारण शेवटी भाषा हे संपर्क व संवादाचे माध्यम आहे. ही त्यांनी भाषिक समृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाची मांडणी केली.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषेतून स्वाक्षरी करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह, सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी यांनी मराठीतून स्वाक्षरी केल्या.
याबरोबरच या वेळी संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीकांत देशमुख यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
पारंपरिक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पारंपरिक पोशाख परिधान केले होते. मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा खैरे यांनी केले. ग्रंथदिंडीचे नियोजन प्रा. सिद्धार्थ नवतुरे यांनी केले. आभार प्रा. दत्तात्रय फटांगडे यांनी मांडले. मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम संपन्नतेसाठी कार्यालयीन अधीक्षक श्री. निलेश ठोंबरे, श्री. अनिल डोळस, श्री. विशाल मोकाटे, श्री. मंगेश गोळे, अक्षय शिंदे, श्री. हनुमंत आटळे श्रीम. दिपाली पवळे, श्रीम. आम्रपाली डोळस आदींनी सहकार्य केले.
COMMENTS