Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील जागा फुरसुंगी – उरुळी देवाची नगर परिषदला हस्तांतरीत केली जाणार!
| स्थायी समितीची मान्यता
PMC Pune – (The Karbhari News Service) – फुरसुंगी – उरुळी देवाची नगर परिषद झाल्यानंतर ही दोन गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आली आहेत. नगर परिषदेने गावाच्या हद्दीतील महापालिकेच्या ताब्यातील जागा हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जागा हस्तांतरित केल्या जाणार आहेत. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समिती ने मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे अधिसुचनेनुसार फुरसुंगी, उरूळी देवाची ही गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे अधिसुचनेनुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातून फुरसुंगी स.नं. १९३, १९२ पै व १९५ पै (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गाठानासह संपूर्ण फुरसुंगी गावाचे क्षेत्र व उरूळी देवाची स.नं. ३०, ३१ व ३२ पै (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावाठाणासह संपूर्ण उरूळी देवाची महसूली गावाचे क्षेत्र वगळण्यात आलेले आहे.
विभागीय आयुक्त यांनी “ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नवनिर्मित फुरसुंगी, उरूळी देवाची नगरपारिषदेला मुलभूत सोयी सुविधा हस्तांतर करणेबाबत, पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी, उरूळी देवाची ही गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करणेबाबत ११/०९/२०२४ रोजी अधिसुचना निर्गमित करण्यात आली आहे. नगरपरिषद हे स्थानिक प्राधिकरण असल्याने लोकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. परंतु सदर नगर परिषद ही नवनिर्मित असल्याने आकृतीबंध निधी व तद्नुषंगिक बाबी मंजूर होणेसाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. याकालावधीमध्ये नागरिकांच्या दैनंदिन मुलभूत सुविधांमध्ये खंड पडू नये म्हणून त्याबाबत नियोजन करणेकामी समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तत्कालीन फुरसुंगी व उरूळी देवाची गावांतील पायाभूत सुविधांची पाहणी करून उक्त सुविधा निश्चित समयसीमेत फुरसुंगी व उरूळी देवाची नगरपरिषदेस हस्तांतरण करणेकरीता रोड मॅप तयार करून ६ महिन्यांच्या आंत समितीने शासनास सादर करावयाचा आहे. तसेच पुणे महानगरपालिके मार्फत पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवांचे टप्याटप्याने हस्तांतर फुरसुंगी व उरुळी देवाची नगरपरिषदेस करणे करीता निश्चित व समयबद्ध योजना तयार करून शासनास सादर करावयाचे आहे.”
प्रशासक, फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद यांनी तत्कालीन दोन्ही ग्रामपंचायतीच्या मालकीहक्काच्या सर्व इमारती, बखळ, बाजार, गाळे व इतर मिळकती यांची माहिती देण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. तसेच पुणे मनपाकडे हस्तांतरीत झालेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरीताच्या जमिनी फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषदेकडे हस्तांतरीत करणेकरीता मागणी केलेली आहे. त्यानुसार मान्य विकास आराखडयानुसार आरक्षित आर.पी. रस्ते, अॅमेनिटी स्पेस जागेंचे ताबे घेण्यात आलेले आहेत. त्यानुसार सदर मिळकतीची यादी तयार करण्यात आलेली असून फुरसुंगी-उरूळी देवाची ग्रामपंचायतीकडून पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या फुरसुंगी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ४१ मिळकती व उरूळी देवाची ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ९५ मिळकती अशा एकूण १३६ मिळकती व तसेच पुणे महानगरपालिकेकडे आरक्षणानुसार एफ.एस.आय. अन्वये ताब्यात आलेल्या फुरसुगी हद्दीतील १० व उरूळी देवाची हद्दीतील ३ अशा एकूण १३ मिळकती ताब्यात आलेल्या आहेत. काही ताब्यात आलेल्या जागेवर प्रशासकीय सेवा देण्याकरीताचे महानगरपालिकेचे कार्यालय सुरू आहे.
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे अधिसुचनेनुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातून फुरसुंगी स.नं. १९३, १९२ पै व १९५ पै (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठानासह संपूर्ण फुरसुंगी गावाचे क्षेत्र व उरूळी देवाची स.नं. ३०, ३१ व ३२ पै (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावाठाणासह संपूर्ण उरूळी देवाची महसूली गावाचे क्षेत्र वगळण्यात आलेले असल्याने महानगरपालिकेच्या ताब्यातील मिळकतींचे नगर परिषदेस हस्तांतर केले जाणार आहे.
COMMENTS