Maratha Reservation Latest News | PMC Pune | मराठा सर्वेक्षण | पुण्यात महापालिकेच्या प्रगणकासमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर! 

HomeपुणेBreaking News

Maratha Reservation Latest News | PMC Pune | मराठा सर्वेक्षण | पुण्यात महापालिकेच्या प्रगणकासमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर! 

गणेश मुळे Jan 23, 2024 4:33 PM

Manoj Jarange Patil | RPI Pune | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा 
Maratha and OBC Reservation | छगन भुजबळ यांनी घेतलेली भेट आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार काय म्हणाले?
Maratha Samaj Survey | मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

Maratha Reservation Latest News | PMC Pune | मराठा सर्वेक्षण | पुण्यात महापालिकेच्या प्रगणकासमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर!

Maratha  Reservation Latest News | Pune PMC | आज पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Reservation Survey) सुरु करण्यात आलं आहे. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुणे शहरात देखील महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) वतीने 2007 प्रगणक नियुक्त करून सर्वेक्षण सुरु केले आहे. मात्र महापालिकेच्या या प्रगणकांना सर्वे करताना खूप तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे खूपच थोडे लोक 25 पेक्षा जास्त घरात सर्वेक्षण करू शकले आहेत. (Pune Municipal Corporation News)

पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण  होत आहे.   सर्वेक्षण  २३ ते ३१ जानेवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या  २००७ प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात  येणार आहे. सदरील  सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप वर livedata entry मार्फत  करण्यात  येणार आहे. (Pune PMC News)

: या येत होत्या अडचणी

महापालिकेच्या प्रगणकांना दररोज 100 घरांत जाऊन सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार प्रगणकांनी आजपासून काम सुरु केले आहे.  मात्र काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार पहिल्याच दिवशी सर्वे करण्याचा ऍप बंद होता. काही ठिकाणी रेंज नसायची. काही ठिकाणी लोकांनी घरातच घेतले नाही. काही लोकांनी सांगून टाकले कि आम्हांला माहिती द्यायची नाही. काही लोकांना माहिती द्यायची होती, मात्र सरकारने दिलेले प्रश्नच असे होते कि लोकांना उत्तरे देताना कचरल्यासारखे झाले. त्यामुळे प्रगणक देखील प्रश्न विचारताना खजील होत होते. काही प्रगणकांनी सांगितले कि मराठा सोडून इतर समाजाची माहिती ऍप मध्ये भरताना फार अडचणी येत नाहीत. मात्र मराठा समाजाची माहिती भरताना ऍप मधेच बंद पडायचा. त्यामुळे सर्व्हर देखील बंद पडायचा. त्यामुळे नव्याने माहिती भरावी लागायची. यामुळे आम्ही 20 घरांच्या पुढे सर्वे करू शकलो नाही. काही प्रगणकांनी सांगितले कि मुस्लिम समाजातील लोकांना त्यांच्या जाती आणि उपजाती माहित नाहीत. समजा कुणाचे आडनाव इनामदार असेल तर ते सांगतात आम्ही उच्च जातीतील आहोत, मात्र त्यांना जात सांगता येत नाही. त्यामुळे देखील माहिती भरताना अडचणी येत होत्या.

: सरकारला खरंच आरक्षण द्यायचे आहे का?

दरम्यान सरकारच्या मागासवर्ग आयोगाने जी प्रश्नावली तयार केली आहे ते प्रश्न विचारणारे  आणि त्याची उत्तरे देणारे असे दोघेही प्रश्नांना त्रासून गेले आहेत. अशा प्रश्नातून काय साध्य होणार आहे, हे कुणाला समजेनासे झाले आहे. त्यामुळे सरकार असा सर्वे करून फक्त वेळकाढूपणा करत आहे का? सरकारला मराठा समाजाला खरंच आरक्षण द्यायचे आहे का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सर्वेक्षणात कोणते प्रश्न विचारले जात आहेत?

तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?

लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा नियम आहे का?

जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का?

हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे.

मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे. त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील.

मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता? तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे? तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? सध्या तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण 20 प्रश्न असतील.

मॉड्यूल ‘सी’ मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

तुमच्या घरात शौचालय आहे का?

तुमच्याकडे शेती आहे का? असेल तर ती कुणाच्या नावावर आहे?

तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे?

मागच्या पंधरा वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का?

तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का? असे एकूण 76 प्रश्न असतील.

या प्रश्नावलीच्या मॉड्यूल ‘डी’मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाईल.

तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का?

विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का?

तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं?

गेल्या दहा वर्षांत तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का?

असे एकूण 33 प्रश्न असतील.

आणि मॉड्यूल ‘ई’मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील. तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल.