गणेश बिडकर यांनी सुरु केलेला लाईट हाऊस उपक्रम समाजाला दिशा देणारा : चंद्रकांत पाटील
– सभागृह नेते बिडकर यांचे केले कौतुक
पुणे : शाळा, महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच ‘कौशल्य विकास शिक्षण’ गरजेचे आहे, यासाठी लाईट हाऊस सारखे उपक्रम अधिकाधिक ठिकाणी सुरू करणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आपल्या भागात सुरू केलेला लाईट हाऊस उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभागृह नेते बिडकर यांच्या कामाचे कौतुक केले.
पुणे महानगपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्या वतीने सोमवार पेठेतील पालिकेच्या भोलागिरी प्राथमिक शाळेत युवक युवतींना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी लाईट हाऊस सुरू करण्यात आले आहे. पालिकेचे सभागृह नेते बिडकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले त्यावेळी ते बोलत होते. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे सिटी कनेक्ट चे चेअरमन गणेश नटराजन, वॅनडरलॅन्ड कंपनीच्या रश्मी आर्या, पालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त रंजना गगे, शिक्षण प्रमुख मीनाक्षी राऊत, भवन विभागाचे प्रमुख शिवाजी लंके, गणेश सोनुने यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. हा प्रकल्प चालविण्यासाठी वॅनडरलॅन्डच्या वतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये देखील आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. मात्र आजही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालेले नाहीत. परिणामी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असल्याचे चित्र आहे, असे पाटील म्हणाले. करोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या हे वास्तव विसरता येणार नाही. या भागातील १८ ते ३० वयोगटातील तरुण तसेच तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी, लाईट हाऊसच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून बिडकर यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरू केला ही मोठी आनंदाची गोष्ट असून असे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू कसे होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. पुण्यासह संपूर्ण राज्यात असे लाईट हाऊस सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नटराजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी कंपनीच्या वतीने या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आर्या यांनी स्पष्ट केले.
सोमवार पेठेत सुरू करण्यात आलेल्या लाईट हाऊस मध्ये दरवर्षी १८ ते ३० वयोगटातील २५० विद्यार्थ्यांना या कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग, हार्डवेअर, डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, टॅली, ॲनिमेशन, फोटोग्राफी, मोबाईल रिपेअरिंग, फॅशन डिझायनिंग असे अनेक कोर्स शिकविले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
देशातील पथदर्शी प्रकल्प म्हणून लाईट हाऊस ची ओळख आहे. शहरातील विविध भागात ११ ठिकाणी लाईट हाऊस सुरू असून सात हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन रोजगार मिळाला आहे. तरुणाईला आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहता यावे, यासाठी पुढील काळात मोठ्या संख्येने अशा पद्धतीचे लाईट हाऊस सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
COMMENTS