Environmental Accountability And Sustainability | ‘पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता’ विषयावर २६ एप्रिल रोजी राष्ट्रीय परिसंवाद
National Green Tribunal – (The Karbhari News Service)– पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए), राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी),सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक(सीईपीआय)च्या संदर्भात ‘पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता’ या विषयावर केंद्रित असलेला राष्ट्रीय परिसंवाद पुणे येथे होणार आहे. या परिसंवादाचे आयोजन नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल बार असोसिएशन( पश्चिम विभाग खंडपीठ, पुणे) चे अध्यक्ष ॲड. सौरभ कुलकर्णी, पर्यावरण सल्लागार राकेश धोत्रे, आणि नितल लॅबोरेटरीज चे अभिषेक टोपे यांच्या तर्फे पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. (Pune News)
शनिवार २६/०४/२०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भांडारकर ओरिएंटल रीसर्च इन्स्टिट्यूट मध्ये होणाऱ्या या परिसंवादाचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. असे पर्यावरण सल्लागार राकेश धोत्रे सांगितले.
या परिसंवादात पर्यावरण विषयक महत्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञांचे विचार मांडले जाणार आहेत. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे तज्ज्ञ सदस्य डॉ.विजय कुलकर्णी हे’कायदेशीर व तांत्रिक सुधारणांद्वारे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए) मजबूत करणे’ या विषयावर बोलणार असून, प्रभाव मूल्यांकन प्रक्रियेतील त्रुटी व तांत्रिक मूल्यांकन समित्यांची भूमिका यावर भर देणार आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सेवानिवृत्त संयुक्त संचालक डॉ.वाय.बी.सोनटक्के हे ‘औद्योगिक प्रक्रियांमध्ये शाश्वततेचा समावेश : आव्हाने व उपाय’ या विषयावर विचार मांडतील. ते शाश्वत उत्पादन, ऊर्जा कार्यक्षमता आणि संसाधन संरक्षण यावर भर देतील.ॲड. सौरभ कुलकर्णी ‘सीईपीआय स्कोअर: औद्योगिक नियमन व विकासातील दुधारी शस्त्र’ या विषयावर बोलणार असून, औद्योगिक घडामोडींवर आणि रोजगारावर सीईपीआय स्कोअरच्या नियामक परिणामांची चर्चा करतील.
‘हा एकदिवसीय परिसंवाद कायदेतज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या विकास मार्गात उत्तरदायित्व, कायदे सुधारणा आणि शाश्वततेबाबत संवाद साधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच ठरेल’,असे पर्यावरण सल्लागार राकेश धोत्रे सांगितले.
COMMENTS